शेतमजूर महिलेने ‘ऊस रस प्रक्रिया’ उद्योगातून मिळवले यश; ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी आहे ‘तिची’ कहाणी | Sugarcane Juice Processing Business Success Story

Sugarcane Juice Processing Business Success Story: परभणी जिल्ह्यातील धर्मापुरी (ता. परभणी) येथील द्वारका गजानन इंगोले यांनी संघर्षाची वाट निवडली आणि कष्टाच्या जोरावर स्वतःचा उद्योग उभा केला. अत्यल्पभूधारक कुटुंबातील द्वारका यांनी पदवी मिळवली, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले, मात्र अपयश आले. परंतु, त्या खचल्या नाहीत. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी शेती आणि शेतमजुरी केली. मात्र, यातून उत्पन्नाचा ठोस मार्ग सापडत नव्हता.

स्वतःचा व्यवसाय करण्याची कल्पना

गावात वर्षभर शेतमजुरीची उपलब्धता नसल्याने द्वारका यांनी गृहउद्योग सुरू करण्याचा विचार केला. मात्र, भांडवल नव्हते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गावातील १० महिलांना एकत्र करून ‘उमेद’ अभियानांतर्गत इंद्रायणी महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन केला. या गटाला बँकेकडून कर्ज मिळाले आणि द्वारका यांच्या वाट्याला ३० हजार रुपये आले. २०२० मध्ये त्यांनी घरगुती पिठाची गिरणी घेतली आणि मसाले निर्मितीला सुरुवात केली. रोजंदारी १५०-२०० रुपये मिळू लागले.

ऊस रस प्रक्रिया उद्योगाची वाटचाल – Sugarcane Juice Processing Business

याच दरम्यान, समाजमाध्यमांवरून ऊस रसापासून विविध उत्पादने बनवण्याची संकल्पना त्यांना मिळाली. कृषी विभागाच्या ‘पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने’अंतर्गत त्यांनी ऊस रस प्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प सादर केला. कृषी पर्यवेक्षक आर. आर. रेंगे आणि कृषी सहायक इंदुमती लोंढे यांच्या मार्गदर्शनाने त्यांना १ लाख ६ हजार रुपये निधी मंजूर झाला, ज्यात ३७,१०० रुपये अनुदान मिळाले. या निधीतून त्यांनी डीप फ्रिजर, गन्ना चुस्की (कुल्फी) निर्मितीचे साचे आणि इतर आवश्यक साधने घेतली.

‘दर्शन अॅग्री नॅचरल प्रॉडक्ट’ची स्थापना

१९ फेब्रुवारी २०२४ रोजी द्वारका इंगोले यांनी ‘दर्शन अॅग्री नॅचरल प्रॉडक्ट’ या ब्रँडखाली त्यांनी ऊस रसावर आधारित विविध पदार्थांची निर्मिती सुरू केली. गन्ना कुल्फी, गन्ना इमली चटणी, जॅम, ऊस रस चहा यासारखी उत्पादने त्यांनी विक्रीसाठी आणली. सातेफळ (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील कावेरी प्रल्हाद बोरगड यांच्याकडून त्यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित उसाचा गोठविलेला रस खरेदी करण्यास सुरुवात केली.

कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग

द्वारका उत्पादनाची जबाबदारी सांभाळतात, तर गजानन विक्रीचे काम पाहतात. शाळा, महाविद्यालये तसेच परभणी शहर परिसरात त्यांच्या गन्ना चुस्की व ऊस रस चहाची विक्री होते. ‘उमेद’ प्रकल्पांतर्गत विक्री व्यवस्थापन कौशल्याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांना व्यवसाय वाढवता आला. महिला बचत गटांच्या प्रदर्शनांमध्ये त्यांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज त्यांच्या उद्योगातून महिन्याला २५ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.

महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण

अपयशामुळे खचून न जाता जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवता येते, हे द्वारका इंगोले यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

📞 द्वारका इंगोले – 7498044780

पतीच्या निधनानंतरही ऊस रोपवाटिकेच्या व्यवसायात यशाची उंची गाठणाऱ्या सारिका लठ्ठे, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी | Women Agriculture Success Story