किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा (Maharashtra weather IMD forecast Yellow alert) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, वातावरणात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने भारतीय हवामान विभागाने आज (ता. १५) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशालगत बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा जम्मूपासून डेहराडून, बाराबंकी, पटना, बंकुरा, कॅनिंग मार्गे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. याशिवाय गुजरात, नैर्ऋत्य राजस्थान आणि नैर्ऋत्य उत्तर प्रदेश परिसरातही उंच वातावरणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने राज्यातील वातावरण अस्थिर झाले आहे.
या हवामान बदलाचा परिणाम म्हणून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, पावसाबरोबरच उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
आजच्या अंदाजानुसार कोकणातील ठाणे आणि रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक ३७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी १७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान असल्याने उकाड्याची तीव्रता कायम आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस) : Maharashtra weather IMD forecast Yellow alert
| ठिकाण | कमाल तापमान | किमान तापमान |
|---|---|---|
| पुणे | 31.2 | 22.7 |
| अहिल्यानगर | 34.6 | 23.3 |
| धुळे | 37.0 | 19.2 |
| जळगाव | 37.6 | 23.8 |
| जेऊर | 34.5 | 16.0 |
| कोल्हापूर | 30.1 | 23.0 |
| महाबळेश्वर | 22.7 | 17.0 |
| मालेगाव | 35.2 | 25.6 |
| नाशिक | 31.3 | 22.8 |
| निफाड | 33.5 | 22.9 |
| सांगली | 32.4 | 22.0 |
| सातारा | 30.2 | 21.2 |
हवामान विभागाने नागरिकांना वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि स्थानिक पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणी, काढणी किंवा इतर शेतीची कामे योग्य नियोजनाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
