संगिता पिंगळे यांची यशोगाथा पाहण्यासाठी खाली व्हीडीओ लिंक दिलेली आहे, ती देखील आपण पाहू शकता.
💐 असामान्य यशोगाथा! 💐
पतीच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांत बाळंतपण… मागोमाग दुःखाच्या, विवंचनेच्या लाटांचा भयानक तडाखा! हादरवून टाकणारी ही परिस्थिती होती एका सामान्य गृहिणीची. आयुष्यात शेतीचा शून्य अनुभव असताना, “तुला हे जमणार नाही,” असं म्हणणाऱ्यांना थेट कृतीतून उत्तर देणारी ही कहाणी आहे!
परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून, संकटांशी झुंज देत, आज 13 एकर शेतीत 10 एकरावरील द्राक्षबाग यशस्वीपणे सांभाळणाऱ्या एका सामान्य स्त्रीची ही असामान्य यशोगाथा आहे! एक अशी यशोगाथा, जी ठामपणे सांगते.. “कष्ट, संयम आणि स्वाभिमान असेल, तर स्त्री कोणत्याही वादळासमोर झुकत नाही!”
आज आपण या मातीतल्या लढवय्या महिलेची अर्थात संगीता पिंगळे यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मातोरी येथे जाणार आहोत…
👩🎓 रसायनशास्त्राची विद्यार्थिनी ते यशस्वी शेतकरी!
शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या संगीता यांनी ‘रसायनशास्त्र’ विषयात पदवी घेतली. शिक्षणानंतर त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी व्हायचं होतं. परंतु, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. संगीता यांचे वडील कै. हरिश्चंद्र कहांडळ यांनी नाशिकमधील मातोरी येथील प्रगतिशील शेतकरी अनिल पिंगळे यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळत गेलं…
🍇 संकट: १३ एकर शेतीचं आव्हान!
पतीच्या निधनानंतर नऊ वर्ष संगीता पिंगळे एकत्रित कुटुंबात राहिल्या. २०१६ साली कुटुंब विभक्त झालं आणि त्यांच्या वाट्याला १३ एकर शेती आली.
शेतीत कधीही पाय न टाकलेल्या संगिता यांच्यासमोर त्यामुळे नवं आव्हान निर्माण झालं होतं. तरीदेखील संगिता यांनी सासरे रामदास पिंगळे आणि सासू अनुसया यांच्या पाठिंब्यामुळे शेतीतील आपली वाटचाल सूरू केली… आणि आज त्या १३ एकर शेतीचं उत्तम रित्या नियोजन करत आहेत!
🚜 ट्रॅक्टर चालवणारी ‘मातीतील लढवय्यी स्त्री’!
सुरूवातीला शेतीतील अनेक गोष्टी संगिता यांच्यासाठी नवीन असल्याने, त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर कस लागत गेला. त्यामुळेच त्या शेतीत मुरत गेल्या. त्यामुळे द्राक्ष शेती करत असताना मजूर जरी आले नाहीत तरी देखील कोणतही काम करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळेच आज त्या स्वतः ट्रॅक्टर चालवत द्राक्ष शेतीत ट्रॅक्टरनं फवारणी देखील करण्याचं काम करतात!
- संगीता पिंगळे सध्या १० एकरात द्राक्ष शेती आणि २ एकरात पीक फेरपालटासाठी टोमॅटो शेती करतात.
- त्यांनी, ‘एकटी महिला शेती करू शकत नाही,’ ही मागास आणि बुरसट विचारसणीच मोडीत काढलीय.
- द्राक्ष शेती करत असताना ऑक्टोबर बहार छाटणी, सिंचन व्यवस्थापन, शेती यंत्रांची दुरुस्ती, मजूर व्यवस्थापन आणि शेतीमाल विक्री अशी सर्व कामे अनुभवातून त्या शिकल्या आहेत.
📈 यशाचं सूत्र: गुणवत्ता आणि नियोजन!
| पीक | क्षेत्र | सरासरी वार्षिक उत्पादन |
| द्राक्ष शेती | १० एकर | २०० टन |
| टोमॅटो शेती | २ एकर | द्राक्ष शेतीचा खर्च भागवण्यासाठी |
| पीक फेरपालटासाठी पडीक | १ एकर | — |
- संगीता पिंगळे दरवर्षी १० एकर द्राक्ष शेतीतून सरासरी दोनशे टनापर्यंत द्राक्ष उत्पादन घेतात.
- यामध्ये लोकल व्हरायटींसोबतच एक्सपोर्ट क्वालिटीच्या व्हरायटींचा देखील समावेश आहे.
- त्याचबरोबर २ एकरातील टोमॅटो पिकातून निघणाऱ्या उत्पनातून द्राक्ष शेतीसाठी करावा लागणारा खर्च त्या भागवतात.
याच योग्य नियोजन आणि गुणवत्ता राखत, बाजारातील मागणीनुसार द्राक्षांच्या व्हरायटी बदलत, संगीता पिंगळे यांनी द्राक्ष शेतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे!
🎯 महिलांसाठी मोलाचा संदेश!
“तुला हे जमणार नाही,” म्हणणाऱ्यांना संगीता पिंगळे यांनी त्यांच्या कृतीतून उत्तर दिलं आहे. त्यामुळे समाजातील महिलांनी देखील कोण काय म्हणतंय यापेक्षा… तुम्हाला काय करायचंय हे ठरवून ते काम नक्की करून पाहा! जमलं तर ठीक… नाही जमलं, तर किमान त्या गोष्टीचा अनुभव तुमच्या पाठीशी राहील. त्यामुळे आयुष्यात काहीच न करता, माघार घेऊ नका, असा मोलाचा संदेश त्या महिलावर्गाला देतात.
🙏 किसानवाणीचा सलाम!
एकूणच संगीता पिंगळे यांनी “शेतीचा अनुभव नसताना… संकटांपुढे न झुकता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर… द्राक्षशेती यशस्वी करत आयुष्याला नव्यानं आकार दिला आहे. म्हणूनच ही केवळ त्यांच्या यशाची नव्हे, तर अडचणींवर मात करून नव्यानं उभं राहण्याची शिकवण देणारी प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांच्या या जिद्दीला, कष्टाला आणि धैर्याला ‘किसानवाणी’चा सलाम!
जर ही कहाणी तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल, तर नक्की लाईक आणि शेअर करा. तसेच अशा मातीतल्या नवनवीन हिरकणींच्या यशोगाथा पाहण्यासाठी ‘किसानवाणी’ला आजच सबस्क्राईब करा!
व्हीडीओ लिंक –
1. पतीच्या निधनानंतर तू काय शेती करणार? घरी बस म्हणणाऱ्यांना दरवर्षी 200 टन द्राक्ष पिकवून दिले उत्तर! (Long Video)
2. पतीच्या निधनानंतर एकटी महिला शेती करू शकत नाही म्हणणाऱ्यांना 200 टन द्राक्षे पिकवून दिले उत्तर (Short Video)
