किसानवाणी | नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रुपये देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजने अंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे.
यासाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. तर, सर्व जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी, खासगी आणि शासकीय बँकांना याबाबत माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.
शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा-आयटीमार्फत लघू संदेश देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात संबंधित सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकांकडून देखील शेतकऱ्यांना व्यक्तीशः कळविण्यात येणार आहे.
लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्याअनुषंगाने विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले, परंतु आधार प्रमाणीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.
२०१९ मधील महात्मा फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र, परंतु तांत्रिक बाबींमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणच्या सूचना सर्व जिल्हा, सहकारी, शासकीय बँकांना केल्या आहेत. सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण झाल्यावर ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. ही संख्या सुमारे ३३ हजार शेतकरी एवढी आहे.
दीपक तावरे, सहकार आयुक्त