किसानवाणी (Mini Tractor Subsidy 2025) | अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या घटकांतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेत 9 ते 18 अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर तसेच कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी करता येणार असून, त्यासाठी 3 लाख 50 हजार रुपयांच्या मर्यादेत तब्बल 90 टक्के म्हणजे कमाल 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंत शासकीय अनुदान मिळणार आहे.
Mini Tractor Subsidy 2025
योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटातील अध्यक्ष, सचिव व किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध घटकांतील असणे आवश्यक आहे. तसेच हे सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.
या योजनेसाठी इच्छुक बचत गटांनी आपले अर्ज 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, बी-विंग, दुसरा मजला, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी थेट समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.