National Fisheries Scheme : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर ( १४ ते २२ फेब्रुवारी )दरम्यान विशेष नोंदणी मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने यासंदर्भात गुरुवारी (ता. १३) माहिती दिली. पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी भागधारकांची नोंदणी करण्यात येणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन:National Fisheries Scheme
या नोंदणी मोहिमे अंतर्गत विविध राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विकास मंडळ आणि सीएसी सेंटरच्या माध्यमातून शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, सातारा, संभाजीनगर आणि नागपूर येथे ही शिबिरे होणार असून, त्यामध्ये मत्स्यव्यवसाय भागधारकांना नोंदणी प्रक्रिया, मंजुरी दर वाढवणे, कर्ज सुविधा, मत्स्यपालन विमा, अनुदान आणि इतर लाभांसंदर्भात माहिती दिली जाणार आहे.
पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी योजना
केंद्र सरकारने २०२३-२४ पासून पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी सह योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेसाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतून ६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. योजनेचा मुख्य उद्देश मत्स्यपालन क्षेत्राचा विकास करणे, संस्थांना वित्तपुरवठा करणे, मत्स्यपालन विम्यासाठी प्रोत्साहन देणे, मूल्यसाखळी कार्यक्षमता सुधारणे आणि मासे सुरक्षा व गुणवत्ता हमी प्रणाली अधिक सक्षम करणे हा आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बाजारपेठेचा विस्तार
देशभरातील मच्छीमार, मत्स्यपालक, विक्रेते, प्रक्रिया उद्योग आणि उद्योगांची नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक नोंदणी या उपयोजनेसाठी झाली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेचा विस्तार होईल आणि उत्पादकता वाढेल, असा विश्वास केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.