Crop Damage Compensation: गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. तब्बल १०२ कोटी रुपयांची मदत शासनाकडे रखडलेली असून, ती कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७,७५८.५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ रुपयांचा प्रस्ताव २७ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील १४,४९३.८७ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले. विशेषतः सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी २२ कोटी ७३ लाख ८६ हजार २९० रुपयांचा संयुक्त प्रस्ताव शासनाला ३० डिसेंबर २०२४ रोजी सादर करण्यात आला.
रब्बी हंगाम ( Crop Damage Compensation) आता संपण्याच्या मार्गावर असून, शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी सज्ज होत आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या १०२ कोटी रुपयांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडून जोरदार मागणी केली जात आहे. अकोट, अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर तालुक्यातील २२७ गावांतील ५६,९८४.५३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये अकोट तालुक्यातील ७७ हेक्टरवर केळी, ८२ हेक्टरवर पानपिंपरी, तसेच १८९.५८ हेक्टरवर लिंबू आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. पातूर तालुक्यातील ३७ हेक्टरवरील लिंबू आणि संत्रा पिकेही अतिवृष्टीमुळे( Crop Damage Compensation) प्रभावित झाली आहेत.
ऑक्टोबर महिन्यात तेल्हारा तालुक्यात चार हजार ९८० हेक्टरवरील कापूस, सहा हजार ५९५ हेक्टरवरील सोयाबीन, ८५३ हेक्टरवरील तूर, १३ हेक्टरवरील ज्वारी, १६४.८७ हेक्टरवरील भाजीपाला, ४८१ हेक्टरवरील केळी, ९४ हेक्टरवरील पपई, १५५ हेक्टरवरील इतर पिके, १९० हेक्टरवरील लिंबू, ६१० हेक्टरवरील संत्रा आणि १६ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
अजूनही शेतकऱ्यांना या मदतीची प्रतीक्षा आहे, त्यामुळे सरकारने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी आणि कृषी संघटनांकडून केली जात आहे.