किसानवाणी | सोलापूर जिल्ह्यातील उच्च दर्जाच्या भगव्या डाळिंबाची पहिल्यांदाच समुद्रमार्गे यशस्वी निर्यात (Pomegranate Export) ऑस्ट्रेलियात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५.७ टन आणि दुसऱ्या टप्प्यात ६.५६ टन अशा एकूण १२.२६ टन डाळिंबाची निर्यात झाली. ३९ दिवसांचा प्रवास करत ही शिपमेंट अनुक्रमे ६ जानेवारीला ब्रिस्बेन आणि १३ जानेवारीला सिडनीला पोहोचली.
अपेडाच्या पुढाकाराने अॅग्रोस्टार आणि के.बी. एक्स्पोर्ट्सच्या सहकार्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे उच्च प्रतीचे डाळिंब या प्रयोगासाठी निवडण्यात आले. हवाईमार्गाने पाठवलेल्या खेपेनंतर अधिक मागणी आणि कमी खर्च लक्षात घेता, समुद्री मार्गाने निर्यातीचा पर्याय वापरण्यात आला.
प्रत्येक पेटीत ३ किलो प्रीमियम फळे ठेवण्यात आली होती. गोडसर चव, आकर्षक रंग आणि उत्तम गुणवत्तेमुळे ऑस्ट्रेलियन ग्राहकांनी या डाळिंबाला चांगली पसंती दर्शवली आहे. हा यशस्वी प्रयोग भविष्यात भारतीय डाळिंबाला ऑस्ट्रेलियन बाजारपेठ मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरणार आहे.
“फळ निर्यातीमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत असून, सध्या ती २९% पर्यंत पोहोचली आहे. डाळिंब निर्यातीतही २०% वाढ झाली असून, आता ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत त्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे,” असे अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितले.