शेतकऱ्यांनी फळपीक उत्पादन, निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन | MAGNET Project
किसानवाणी | देशात महाराष्ट्र फळे व भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. मात्र काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उत्पादित शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर होते. हे नुकसान टाळून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करण्याच्या उद्देशाने मूल्यसाखळी विकसित होण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प (MAGNET Project) राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध फळपिकांच्या उत्पादन ते निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रकल्प संचालक राजेंद्र महाजन यांनी केले आहे.
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाअंतर्गत (मॅग्नेट) वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेत, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या वतीने आंबा, काजू, पडवळ व चिकू या पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाजन बोलत होते. यावेळी वैकुंठ मेहता संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव, सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, महाव्यवस्थापक संजयकुमार सुद्रीक उपस्थित होते.
या वेळी महाजन म्हणाले, की कीड, रोग व विषमुक्त शेतीमालाची मागणी वाढत आहे. यासाठी लागवडीपासूनच कीड-रोग आणि कीटकनाशके फवारणीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणीनुसार फळे व भाजीपाला पिकामध्ये शेतकऱ्यांची काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. यासाठीच मॅग्नेट प्रकल्प (MAGNET Project) राबविण्यात येत असून, या अंतर्गत नव्याने उभ्या करावयाच्या विविध निर्यात सुविधा केंद्रांच्या शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, यासाठी या प्रकल्पअंतर्गत ६० टक्के अनुदानाची तरतूद आहे.
यावेळी बोलताना डॉ. हेमा यादव म्हणाल्या, की शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संघटन शक्ती निर्माण करणे व त्यामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे हे कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. तर सुद्रीक म्हणाले, की शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व अधिक नफा मिळविण्यासाठी प्रत्येक पिकाचे काढणीपश्चात तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करणे व त्याची मूल्यसाखळी विकसित करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी तर प्रास्ताविक दिगंबर साबळे यांनी केले. या वेळी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तिपत्रक वाटप करण्यात आली.