Manikrao Kokate : राज्याच्या विद्यमान कृषिमंत्र्यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा; न्यायालयाचा निकाल

किसानवाणी | शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या भिकाऱ्यांशी तुलना करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (ता. २०) कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असून मंत्रीपदही जाणार आहे.

घर खरेदी प्रकरणात शिक्षा – Manikrao Kokate

१९९५ ते १९९७ दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी सरकारकडून सरकारी सदनिका खरेदी केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उत्पन्न कमी असल्याचे आणि दुसरे घर नसल्याचे भासवून सदनिका घेतल्याचा आरोप आहे. त्यावर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोकाटेंचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होणार?

कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते.

महायुती सरकारसाठी नवी अडचण

महायुती सरकारमध्ये नुकतेच कोकाटे यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याआधी धनंजय मुंडे कृषिमंत्री होते, मात्र त्यांच्यावरील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने महायुती सरकारसाठी आणखी एक अडचण निर्माण झाली आहे.

शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंचे प्रयत्न

दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांना सुनावलेल्या शिक्षेला आज न्यायालयात आव्हान देणार आहेत. कोकाटे यांच्याकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. कोकाटे यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निर्णयाला विरोधात कोकाट सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी कोकाटे यांचे प्रयत्न सुरु आहेत.

शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना करणारा कृषिमंत्री

भिकारी सुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला, तरीही काही लोक त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात. असे वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते.

पतीच्या निधनानंतरही ऊस रोपवाटिकेच्या व्यवसायात यशाची उंची गाठणाऱ्या सारिका लठ्ठे, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी | Women Agriculture Success Story