किसानवाणी : राज्यात अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र (Monsoon Farming Snail Control) आणि मराठवाड्यातील काही भागांत सोयाबीन, कापूस, भाजीपाला तसेच इतर कोवळ्या पिकांमध्ये गोगलगायीमुळे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास या किडीमुळे रोपांची वाढ खुंटणे, पाने व फुले नष्ट होणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित शेत पाहणी करून सुरुवातीच्या टप्प्यातच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
शंखी गोगलगाय ही बहुभक्षी कीड असून ती अनेक प्रकारच्या पिकांवर उपजीविका करू शकते. सोयाबीन, कापूस, विविध भाजीपाला पिके, फळझाडे, कडधान्ये, तेलबिया, तुती, उंबर यांसारख्या पिकांवर तिचा प्रादुर्भाव दिसून येतो. कोवळी पाने, नवीन फुटवे, फुले आणि फळे खाण्याबरोबरच ती कुजलेली पाने, शेणखत, जनावरांचे शेण, कागदाचे पुठ्ठे आणि इतर सेंद्रिय कचऱ्यावरही जगू शकते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही तिचा टिकाव लागतो.
गोगलगायींच्या जीवनचक्राचा विचार केला तर ऑक्टोबर ते मे या कालावधीत त्या जमिनीत खोलवर सुप्तावस्थेत राहतात. या काळात अन्न-पाण्याशिवाय चार ते सहा महिने जगण्याची त्यांची क्षमता असते. काही प्रतिकूल परिस्थितीत त्या तीन वर्षांपर्यंतही सुप्तावस्थेत राहू शकतात. साधारणपणे त्यांचा जीवनकाल पाच ते सहा वर्षांचा असतो. जून ते सप्टेंबरदरम्यान पाऊस, जास्त आर्द्रता, कमी तापमान, सावली आणि दलदलीचे वातावरण तयार होताच त्या जमिनीबाहेर येतात आणि कोवळ्या पिकांवर आक्रमण सुरू करतात.
गोगलगायीचा प्रादुर्भाव ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गोगलगाय सरपटताना चिकट स्राव सोडते. हा स्राव वाळल्यानंतर पानांवर किंवा जमिनीवर पांढरट व चमकदार रेषा दिसतात. हे प्रादुर्भावाचे सुरुवातीचे लक्षण मानले जाते. दिवसा या गोगलगायी दगडाखाली, पालापाचोळ्यात, दाट गवतामध्ये किंवा झाडांच्या बुंध्याजवळ लपून बसतात. रात्री त्या बाहेर पडून कोवळी पाने, फुले आणि रोपे खातात. प्रौढ गोगलगाय भुसभुशीत मातीमध्ये साबुदाण्यासारखी दिसणारी पिवळसर-पांढरी अंडी घालते आणि एक गोगलगाय एकावेळी २०० ते ५०० अंडी घालू शकते.
घरगुती व्यवस्थापनाचे उपाय
प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वप्रथम शेताची नियमित पाहणी करावी. आढळणारी अंडी गोळा करून नष्ट करावीत. दगड, पालापाचोळा, गवत किंवा ओलसर ठिकाणी लपलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. शेतालगतचे बांध आणि परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून त्यांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही.
संध्याकाळी शेतात साधारण ७ ते ८ मीटर अंतरावर वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाल्याच्या अवशेषांचे छोटे ढिग तयार करावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी या ढिगांखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नायनाट करावा.
गोळा केलेल्या गोगलगायी कशा नष्ट कराव्यात?
गोळा केलेल्या गोगलगायी उकळत्या पाण्यात, साबणाच्या द्रावणात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करता येतात. तसेच तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये गोगलगायी पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकणे हा देखील प्रभावी उपाय आहे. दुसरा पर्याय म्हणजे रिकाम्या प्लास्टिक किंवा सिमेंटच्या पोत्यामध्ये गोगलगायी भरून त्यावर कोरडे मीठ किंवा चुना टाकून पोते शिवून ठेवावे. त्यामुळे त्या नष्ट होतात.
लहान गोगलगायींच्या नियंत्रणासाठी प्रति लिटर पाण्यात १०० ग्रॅम मीठ मिसळून तयार केलेल्या द्रावणाची फवारणी करता येते. फळबागेमध्ये झाडांच्या खोडावर १० टक्के बोर्डोपेस्ट लावल्यासही काही प्रमाणात संरक्षण मिळते.
प्रादुर्भाव वाढल्यास काय करावे?
गोगलगायींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्यास मुख्य पिकाभोवती दोन मीटर रुंदीच्या पट्ट्यात राख पसरावी. त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना २:३ या प्रमाणात मिसळून पातळ थर द्यावा. मात्र हा उपाय कोरड्या परिस्थितीत अधिक प्रभावी ठरतो. जमीन ओली असल्यास किंवा पाऊस सुरू असल्यास त्याचा परिणाम कमी होतो. तसेच जिवंत गोगलगायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे टाळावे, अन्यथा किडीचा प्रसार वाढू शकतो.
रासायनिक नियंत्रण
प्रादुर्भाव जास्त असल्यास दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरावे. फळबागेमध्ये प्रत्येक झाडाखाली १०० ग्रॅम मेटाल्डिहाईड टाकण्याची शिफारस करण्यात येते. मात्र पावसानंतर या औषधाची परिणामकारकता कमी होऊ शकते.
विषारी आमिष तयार करण्याची पद्धत
१० लिटर पाण्यात २ किलो गूळ आणि २५ ग्रॅम यीस्ट मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गहू किंवा भाताच्या कोंड्यामध्ये मिसळून १० ते १२ तास आंबण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये मिथोमिल ४० एसपी ५० ग्रॅम मिसळून तयार झालेले आमिष संध्याकाळी शेतात किंवा बांधालगत प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी ठेवावे. आमिष खाल्ल्यानंतर गोगलगायी त्याच ठिकाणी मरतात. दुसऱ्या दिवशी त्या गोळा करून किमान एक मीटर खोल खड्ड्यात पुराव्यात.
आमिष तयार करताना आणि वापरताना हातमोजे, मास्क आणि संरक्षणात्मक चष्मा वापरणे आवश्यक आहे. तसेच आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी कोंबड्या, पक्षी किंवा इतर पाळीव प्राण्यांनी खाणार नाहीत, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
गोगलगायी व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे उपाय : Monsoon Farming Snail Control
| बाब | शिफारस |
|---|---|
| प्रादुर्भावाची लक्षणे | पानांवर चिकट पांढरट रेषा, कोवळी पाने कुरतडलेली दिसणे |
| घरगुती उपाय | अंडी व गोगलगायी गोळा करून नष्ट करणे, शेत स्वच्छ ठेवणे |
| संरक्षणात्मक उपाय | गवताचे ढिग तयार करून सकाळी गोगलगायी गोळा करणे |
| रासायनिक नियंत्रण | मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकर |
| विषारी आमिष | गूळ + यीस्ट + कोंडा + मिथोमिल मिश्रण |
| विशेष सूचना | जिवंत गोगलगायी दुसऱ्या ठिकाणी नेऊ नयेत |
