कृषी पदवीधरांवर शेतकऱ्यांना उभारी देण्याची जबाबदारी – विलास शिंदे
किसानवाणी | मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधरांवर येथील शेतकरी समाजाला उभारी देण्याची जबाबदारी आहे. मराठवाड्यात कार्व्हर सारखे शेतकरी तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ व्या वार्षिक अधिवेशनात बुधवारी (ता. १३) दुपारी ‘मराठवाड्यातील शेती संधी व आव्हाने’ या विषयावर शिंदे बोलत होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. शेती सोडून नोकरी, व्यवसायात त्यांना रस आहे. शेतीचे प्रश्न शास्त्रीय आहेत. ते शास्त्रीय दृष्टिकोनातून सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीय विचार केला पाहिजे. कृषी अभियंत्याचे शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. मराठवाड्यातील सोयाबीन व कापूस शेती करण्याची पद्धती व्यावसायिक नाही. पांरपरिक पद्धतीमुळे नुकसान होत आहे. सोयाबीन व कापूस शेतीत जागतिक स्तरावर भारतीय शेतकरी टिकू शकत नाही. अमेरिकेत आपल्यापेक्षा चारपट जास्त उत्पादकता आहे. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्चही कमी लागतो.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. झा म्हणाले, की शेतकऱ्यांना पेरणी ते काढणी तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान देण्यात कृषी अभियंते निपुण असतात. त्यासाठी कृषी अभियंता असे केडर तयार करावे लागेल. पंचायत ते जिल्हा स्तरावर कृषी अभियंत्याची पदस्थापना करण्याची गरज आहे.
यावेळी मराठवाड्यातील राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त तसेच पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, भारतीय कृषी अभियंता सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा, कुमार बिमल, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग, डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.
#VilasShinde #SahyadriFarms