Sustainable Farming in China: चीन सरकारने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. १५ गावांचा समूह तयार करून त्यांना उच्च दर्जाचा भाजीपाला, फळे, दूध, नैसर्गिक उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःच्या जमिनीवर पीक उत्पादन वाढवू लागले असून, त्यांचा माल थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचत आहे.
ग्रामीण भागातील पायाभूत सुधारणा
सरकारने ग्रामीण भागातील रस्ते, महामार्ग आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. नवीन महामार्ग, पूल आणि हरित तंत्रज्ञानावर आधारित वाहतूक सुविधांमुळे शेतीमालाची जलद वाहतूक सुलभ झाली आहे. या पायाभूत सुधारणा केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर पर्यटनाला चालना देण्यासाठीही उपयुक्त ठरत आहेत. या धोरणामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे.
पारंपरिक वारसा जतन करण्यावर भर
चीनच्या ग्रामीण भागात पारंपरिक वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण योजना आखल्या आहेत. जुनी घरे आणि पारंपरिक इमारतींचे नूतनीकरण करून त्यांचा उपयोग पर्यटनासाठी केला जात आहे. गावातील कला, संस्कृती आणि हेरिटेज टिकवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी विविध उपक्रम राबवले आहेत. सार्वजनिक जागांमध्ये वाचनालय, कला केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कृषी प्रदर्शन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
कृषी पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था
शांघायसारख्या शहरी भागांत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी व्यवसायाला चालना देण्यात आली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ओरिएंटल पर्ल रेडिओ आणि टीव्ही टॉवर, जो पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. शहरी आणि ग्रामीण भागांना जोडण्यासाठी अत्याधुनिक वाहतूक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. कृषी उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी विशेष केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी झाले आहे.
शाश्वत शेती आणि पर्यावरण संरक्षण
चीनमध्ये जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असून, सेंद्रिय शेती, जलसंधारण तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा प्रकल्पांवर भर दिला जात आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सेंद्रिय खतांचा वापर, कीटकनाशकांच्या नैसर्गिक पर्यायांचा स्वीकार आणि शाश्वत शेतीतंत्राचा अवलंब केला जात आहे. सरकारने प्लॅस्टिक बंदी, कचऱ्याच्या पुनर्वापरासह नद्यांचे शुद्धीकरण करण्याच्या योजना राबवल्या आहेत. यामुळे प्रदूषण कमी होऊन दीर्घकालीन आर्थिक लाभ होत आहेत.
कृषी पर्यटनाला मोठी चालना
झेजियांग प्रांतातील डोंगराळ भागात कृषी पर्यटन प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात आला आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारून स्थानिक गावकऱ्यांना एकत्र आणून रोजगारनिर्मिती केली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला असून, पर्यटकांसाठी स्थानिक अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. यामुळे ग्रामीण पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम
शिक्षण आणि व्यवसाय कौशल्य विकासावर भर देत चीनने विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण केली आहे. कृषी संशोधन आणि तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जात असून, तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. शालेय स्तरावरूनच व्यावहारिक शिक्षण दिले जात आहे. एमबीए आणि इंजिनिअरिंगच्या महाविद्यालयांमध्ये शिस्तबद्ध वातावरण राखले जाते आणि विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रेरित केले जाते.
भारतातील ग्रामीण विकासासाठी दिशादर्शक मॉडेल
चीनच्या ग्रामीण विकास धोरणाने शाश्वत शेती आणि आर्थिक प्रगतीचा संतुलित विकास साधला आहे. स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठ मिळवून देण्याची व्यवस्था, कृषी पर्यटन आणि पारंपरिक वारशाचे जतन यामुळे रोजगार निर्मिती वाढली आहे. यामधील शाश्वत शेती आणि ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनाचे मॉडेल भारतासाठीही प्रेरणादायी ठरू शकते. यातून भारताच्या ग्रामीण विकास धोरणासाठी नवे मार्गदर्शन मिळू शकते.
सोर्स: डॉ. विवेक भोईटे, ७७२००८९१७७ (कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे) Agrowon Article