किसानवाणी | जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातल्या आंधळी गावच्या मयूर जगदाळे या तरूणांन हेच सिध्द करून दाखवलय. त्यानं अवघ्या 27 बाय 27 फूट जागेत तब्बल 20 लाखांची कमाई करून देणारा प्रकल्प यशस्वी केलाय. इतक्या कमी जागेत इतकी प्रचंड कमाई करून देणारा असा कोणता प्रकल्प मयूरनं उभारलाय हेच आज आपण किसानवाणीच्या (Kisanwani) माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मयूरनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलय. त्यानंतर त्यानं काही काळ नोकरी देखील केलीय. परंतु नोकरीत फारस मन रमत नसल्यानं कोरोना काळात त्यानं नोकरीला कायमचा रामराम ठोकलाय. नोकरी सोडल्यानंतर मयूरनं स्वतःची वेगळी वाट चोखाळत आपली ओळख निर्माण केलीय. पारंपारिक शेतीला फाटा देत त्यानं सुरूवातीला पर्ल फार्मिंगचा (Pearl Farming) व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्याला चांगल यश मिळाल्यानंतर त्यांन आणखी एक पाऊल पुढे टाकत गोड्या पाण्यातील खेकडा पालनाचा प्रकल्प (Crab Farming) हाती घेऊन तोही यशस्वी करून दाखवलाय.
तसं पाहिलं तर महाराष्ट्रासह भारतभरात खेकड्यांना वर्षभर मोठी मागणी असते. सर्वत्र खेकडे आवडीनं खाल्ले जातात. असं असलं तरी बाजारात मात्र फक्त पावसाळ्या दरम्यानचं खेकडे नजरेला पडतात. याचाच अर्थ मागणीच्या तुलनेत खेकड्यांच उत्पादन कमी असल्यानं बाजारात त्यांची फारशी उपलब्धताच नसते. त्यामुळचं त्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं चित्र दिसून येत. म्हणूनच खेकडा पालनात कमाईची चांगली संधी असल्याचं मयूर सांगतो.
मयूरला त्याच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा खेकडा पालन प्रकल्प उभारणीत चांगला फायदा झालाय. त्यानं इंजिनिअरिंगच ज्ञान वापरून अगदी कमीत कमी जागेत नैसर्गिक वातावरणासारखं स्ट्रकचर तयार करून टॅंकची निर्मीती केलीय. सध्या त्यानं तयार केलेल्या टँकची 4 टनापर्यंत खेकडे संगोपन करण्याची क्षमता आहे.
खेकड्यांचं संगोपन सुरू केल्यानंतर साधारणतः 9 ते 10 महिन्यांनी ते विक्री योग्य होतात. 250 ते 300 ग्रॅम वजनाच्या पुढे वाढ झालेल्या खेकड्यांची विक्री केली जाते. मयुरनं संगोपन केलेल्या खेकड्यांचं वजन जास्तीत जास्त 700 ग्रॅम पर्यंत भरतं. ज्या खेकड्यांची योग्य वाढ झालीय असेच खेकडे विक्रीस काढले जातात. तर उर्वरित खेकडे पुढील पैदासीसाठी ठेवले जातात. हे नियोजन अगदी काटेकोरपणे करणं फार महत्वाच असल्याचं मयूर सांगतो.
मयूरनं टँक तयार झाल्यानंतर त्यात 150 किलो खेकड्यांची पिल्ल सोडली. या 150 किलो खेकड्यांपासून 9 ते 10 महिन्यानंतर जवळपास 3000 किलो खेकड्यांची पैदास झालीय. आत्तापर्यंत यातील 900 किलो खेकड्यांची 350 ते 400 रूपये प्रतिकिलो दरानं खाण्यासाठी विक्री केलीय. त्याचबरोबर 500 किलो खेकड्यांची पिल्लं इतरांना संगोपनासाठी 500 रूपये प्रति किलो या दरानं विकली आहेत. यातून त्याला आत्तापर्यंत 5 लाख 20 हजारांच उत्पन्न हाती आलयं. तर टॅंक मध्ये अद्याप दोन हजार किलोच्या आसपास खेकडे शिल्लक आहेत. यातून त्याला आणखी 8 ते 10 लाखांच उत्पन्न हाती येण्याची अपेक्षा आहे.
खेकडा संगोपनात टँकमधील पाण्याचा पीएच योग्य प्रमाणात राखणं सर्वात महत्वाचं असल्याचं मयूर सांगतो. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात टॅंकमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी फॉगरचा वापर, पाण्यामध्ये पाण्याच्या लहरी निर्माण करण्यासाठी उपाययोजना.. अशा वेगवेगऴ्या पध्दतीनं मयूरनं खेकडा संगोपन करताना बारीक सारीक बाबींवर लक्ष दिलय. यामुळं खेकड्यांची नैसर्गिक पध्दतीनं चांगली वाढ होण्यास मदत होत असल्याचं मयूर सांगतो.
मयूरनं खेकडा संगोपन प्रकल्पासाठी अडीच ते 3 लाख रूपयांच्या आसपास खर्च केलाय. विशेष म्हणजे हा खर्च एकदाच करावा लागत असून यातून वर्षानुवर्षे चांगला नफा कमवता येतो. तसच खेकडा संगोपन करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज भासत नाही. खेकड्यांची सतत देखभाल देखील करावी लागत नाही, त्यामुळं अगदी कमी खर्चात आणि कमी श्रमात खेकडा संगोपनातून चांगली आर्थिक कमाई करता येत असल्याचं मयूर सांगतो.
सध्या मयूरनं उभारलेल्या खेकडा संगोपन प्रकल्पाला वेगवेगळ्या राज्यातून अनेक लोक भेटी देतात. त्याचबरोबर ज्या लोकांना खेकडा संगोपन करायचं आहे त्यांना देखील मयूर मार्गदर्शन करतोय. त्यामुळंच मयूरनं सुरू केलेलं खेकडा संगोपन दिवसेंदिवस आणखी यशस्वी होताना दिसतय. म्हणूनच मयूरची ही यशोगाथा नव्यानं कोणताही व्यवसाय सुरू करण्याची तयारी करणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.