महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, पुणे, सातारा रेड अलर्टवर, ‘या’ जिल्ह्यांतही जोरदार सरींचा अंदाज | Low Pressure Area

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर(Low Pressure Area)अद्याप कायम असून अनेक भागांत जोरदार ते मुसळधार सरी कोसळत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आजही राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अल्पावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींसह स्थानिक स्वरूपाचे पाणी साचणे किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

आजचा हवामान इशारा : Low Pressure Area

अलर्टजिल्हे / भाग
रेड अलर्टनाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा
ऑरेंज अलर्टपालघर, ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव
येलो अलर्टमुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
हलक्या सरींची शक्यताहिंगोली, परभणी, नांदेड

दरम्यान, उद्या म्हणजे शनिवारीही कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यांसाठी काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच नंदुरबार, ठाणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडण्याचा अंदाज असून राज्यातील उर्वरित भागात ऊन-सावल्यांचा खेळ आणि अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

शनिवारीचा अंदाज : Low Pressure Area

अलर्टजिल्हे / भाग
ऑरेंज अलर्टनाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, रायगड
येलो अलर्टनंदुरबार, ठाणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा, चंद्रपूर
हलक्या सरीसातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर
इतर भागऊन-सावल्यांसह हलक्या सरी

हेही वाचा : NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts

साखरेच्या वाढत्या दरांवर सरकारचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून ४०० टनांची साठा मर्यादा लागू ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती| Sugar Stock Limit

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मॉन्सूनचा आस जैसलमेर, उदयपूर, इंदूर, पश्चिम विदर्भ आणि लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रातून पुढे गोपालपूरमार्गे मध्य बंगालच्या उपसागराकडे आग्नेय दिशेने विस्तारलेला आहे. या वातावरणीय स्थितीमुळे राज्यातील अनेक भागांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, पूर्व विदर्भ आणि लगतच्या पश्चिम-मध्य छत्तीसगडावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत ताशी सुमारे १५ किलोमीटर वेगाने पश्चिम-उत्तरपश्चिम दिशेने सरकले आहे. आज सकाळी साडेआठ वाजता हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम विदर्भ आणि लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशावर केंद्रित होते. त्याचे केंद्र अमरावतीच्या सुमारे ५० किलोमीटर पूर्व-ईशान्येस, वर्ध्याच्या ६० किलोमीटर वायव्येस, बैतूलच्या ९० किलोमीटर दक्षिण-आग्नेयेस, खंडवाच्या २१० किलोमीटर पूर्व-आग्नेयेस आणि खरगोनच्या २८० किलोमीटर पूर्व-आग्नेयेस नोंदविण्यात आले आहे.

हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील काळात पश्चिम-उत्तरपश्चिम दिशेने विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेश आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावरून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच पुढील २४ तासांत या प्रणालीची तीव्रता कमी होऊन ती सुस्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या वातावरणीय घडामोडींमुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा