बातम्या

सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या | Soybean Kapus Anudan

किसानवाणी | सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २१ ऑगस्टपासून त्यांच्या खात्यावर अनुदान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आणि कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब लागणार अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सध्या सोयाबीन-कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली. एका शेतकऱ्याला २ हेक्टरसाठी जास्तीत जास्त १० हजार रुपये तर २० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट १ हजार रुपये मिळणार आहेत. २०२३ च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅप किंवा पोर्टलवर नोंदणी केली, असे शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत.

पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून संमती पत्र भरून घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आधारवरील माहिती वापरण्यासंबंधीचे संमती पत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचे आहे. तर सामायिक खातेदारांना ना हरकत पत्र भरून द्यायचे आहे. जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावरील अनुदान रक्कम एका खातेदारांच्या नावावर जमा करण्यात येईल.

सोयाबीन-कापूस अनुदान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची संख्या?

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेली राज्यातील ९० लाख सोयाबीन आणि कापूस उत्पादक या योजनेला पात्र आहेत. त्यामध्ये ५८ लाख सोयाबीन उत्पादक आहेत तर ३२ लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. यामध्ये ७५ लाख खातेदार आहेत. तर १५ लाख सामायिक खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांकडून आधार संमती पत्र आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया बुधवार म्हणजे २१ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.

अनुदान बँक खात्यात कधी?

कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर मिळावे, यासाठी कृषी विभाग काम करत आहे. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सोयाबीन आणि कापूस अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी घाई करू नये. तसेच कृषी विभागाला संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

Back to top button