‘सुपर एल निनोच्या’ पार्श्वभूमीवर जल, मृदा संधारणास द्या प्राधान्य; कोरडवाहू शेतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला… | Water Conservation

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसमोर हवामान बदल आणि संभाव्य ‘सुपर एल निनो’मुळे (Water Conservation) नवीन आव्हाने उभी राहत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या सुपर एल निनो परिस्थितीचा परिणाम भारतातील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा भागात पावसाचे अनियमित वितरण, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ पावसाचा खंड अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात. या बदलांचा थेट परिणाम शेती उत्पादन, मृदा आरोग्य आणि पाण्याच्या उपलब्धतेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, उशिरा पाऊस येणे, दीर्घ पावसाचा खंड पडणे आणि जमिनीतील ओलावा कमी होणे या समस्या वाढत आहेत. तसेच उष्णतेच्या लाटांमुळे पिकांवर ताण येत असून फुलधारणा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत उत्पादनात घट होण्याचा धोका वाढत आहे. याशिवाय मृदा धूप आणि पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतींसोबत वैज्ञानिक मृदा व जलसंधारण, जमीन विकास, कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा समन्वित वापर करणे आवश्यक बनले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्त्वाचा अवलंब करून कमी पावसातही उत्पादन टिकवून ठेवणे शक्य होऊ शकते.

प्रमुख मृदा व जलसंधारण उपाययोजना : Water Conservation

उपाययोजनाप्रमुख फायदे
उताराला आडवी मशागतपाण्याचा वेग कमी होतो, मृदा धूप नियंत्रणात राहते, पाणी जमिनीत अधिक मुरते
संरक्षित सरीपावसाचे पाणी साठते, ओलावा वाढतो, अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो
डेड फरोपावसाच्या खंडात ओलावा टिकून राहतो, पिकांच्या वाढीस मदत होते
वाफे पद्धतपाणी धारण क्षमता वाढते, सुपीकता टिकून राहते
ठरावीक ओळींनंतर सरीपिकांना दीर्घकाळ ओलावा उपलब्ध राहतो
रुंद वरंबा सरी पद्धतअतिरिक्त पाण्याचा निचरा होतो, मुळांची वाढ सुधारते
आच्छादनबाष्पीभवन कमी होते, तण नियंत्रणास मदत होते
समोच्च चरमृदा धूप कमी होते, पाण्याची झिरपण्याची क्षमता वाढते
ओलावा संवर्धनमाती भुसभुशीत राहते, पाणी धारण क्षमता वाढते

याशिवाय उन्हाळी खोल नांगरट, वेळेवर कोळपणी आणि जमिनीवरील कडक थर फोडणे या उपायांमुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकवून ठेवता येतो.

जमीन विकास उपायांचीही गरज

जलसंधारणासोबत जमीन विकासाच्या उपाययोजनादेखील तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. जमीन सपाटीकरण केल्यास पाण्याचे समान वितरण होते आणि सिंचन कार्यक्षमता वाढते. शेततळे निर्मितीमुळे पावसाचे पाणी साठवून संरक्षित सिंचनासाठी वापर करता येते. तसेच रिचार्ज पीट, नाला बांध आणि चेकडॅम यांसारख्या जल पुनर्भरण संरचनांमुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत मिळते.

बांधांवर गवताची लागवड करून तयार केलेले जैविक अडथळे मृदा धूप रोखण्यात प्रभावी ठरतात. समतल मशागत आणि समपातळी रेषांना समांतर पेरणीमुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो व जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. तसेच बंदिस्त बांध पद्धतीमुळे पावसाचे पाणी शेतात अडवून भूजल पुनर्भरणाला चालना मिळते.

हवामानातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी मृदा व जलसंधारण, जमीन विकास, कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. योग्य नियोजन आणि वैज्ञानिक उपाययोजनांच्या मदतीने कमी पावसाच्या परिस्थितीतही शेती उत्पादन टिकवून ठेवणे आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे शक्य होणार आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा