कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनची आगेकूच; पुढील २-३ दिवसांत आणखी विस्ताराची शक्यता | Maharashtra Monsoon Rain Update

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

कोल्हापूर : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मॉन्सूनने महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon Rain Update) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात लक्षणीय प्रगती केली असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाळ्याचे वातावरण अधिक सक्रिय झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ९) मॉन्सूनने रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारली आहे. हवामानाची सध्याची स्थिती मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यंदा मॉन्सूनचे केरळमधील आगमन दीर्घकालीन सरासरी वेळेपेक्षा तीन दिवस उशिरा झाले. ४ जून रोजी मॉन्सूनने केरळमध्ये प्रवेश केला. मात्र त्यानंतर मॉन्सूनच्या प्रवाहाची गती वाढली आणि केवळ एका दिवसात त्याने कर्नाटक किनारपट्टीमार्गे गोव्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर शनिवारी (ता. ६) मॉन्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला. विशेष म्हणजे केरळमध्ये उशिराने दाखल होऊनही महाराष्ट्रातील आगमन यंदा सरासरीपेक्षा एक दिवस आधी झाले आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून शाखेनेदेखील वेगाने प्रगती केली आहे. रविवारी (ता. ८) या शाखेने संपूर्ण नागालँड, मणिपूर आणि मिझोराम राज्य व्यापले. तसेच त्रिपुरा, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्येही मॉन्सूनची प्रगती झाली.

सोमवारी (ता. ९) महाराष्ट्रात मॉन्सूनने संपूर्ण सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे व्यापले आहेत. याशिवाय रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही मॉन्सून सक्रिय झाला आहे. दक्षिण भारतातही मॉन्सूनची वाटचाल सुरू असून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आणखी काही भागांमध्ये त्याने प्रगती केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मॉन्सूनची सध्याची उत्तरेकडील सीमा हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंद्याल, चेन्नई तसेच ईशान्य भारतातील केलाशहर, लामडिंग आणि उत्तर लखीमपूरपर्यंत पोहोचली आहे. ही स्थिती मॉन्सूनच्या विस्तारासाठी अत्यंत पोषक मानली जात आहे.

येत्या काही दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडू तसेच ईशान्य भारतातील उर्वरित प्रदेश मॉन्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यांमध्येही मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात असून आगामी काळात पावसाचा विस्तार आणि तीव्रता यावर कृषी हंगामाचे नियोजन अवलंबून राहणार आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा