किसानवाणी : महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी राज्याच्या मोठ्या भागात अद्याप मॉन्सूनची प्रतीक्षा (Maharashtra Weather Monsoon Update) कायम आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत दमदार सरी कोसळल्या असून, हवामान विभागाने आज (१० जून) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित भागात मात्र ढगाळ वातावरणासह उष्णता आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मंगळवारी (९ जून) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील श्रीगंगानगर येथे देशातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्या उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच बिहारपासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने हवामानातील बदलांना चालना मिळत आहे.
राज्यातील तापमानाचा विचार करता नागपूर येथे ४३.२ अंश सेल्सिअससह सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा, अकोला, अमरावती, गोंदिया, यवतमाळ आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले. धुळे, जळगाव आणि मालेगावमध्येही तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक राहिले. दुसरीकडे, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
हवामान विभागाने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यासाठी उष्ण व दमट हवामानाचा विशेष इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बंगालच्या उपसागराकडून पुढे सरकत संपूर्ण पूर्वोत्तर भारत आणि सिक्कीम राज्य व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयालगतच्या भागातही मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र अरबी समुद्रावरील मॉन्सूनची वाटचाल मंदावल्याने महाराष्ट्रात हर्णे ते सोलापूरपर्यंतची स्थिती अद्याप जैसे थे आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तमिळनाडू तसेच पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या आणखी काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. कोकणातील गुहागर येथे सर्वाधिक १३० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी येथे ७० मिमी, रामेश्वर येथे ५० मिमी, तर राजापूर, देवगड, दोडामार्ग, हर्णे आणि सावंतवाडी येथेही लक्षणीय पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात बारामती येथे ७० मिमी, दौंड येथे ५० मिमी, तर गडहिंग्लज, जेऊर आणि नांदगाव येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात जळकोट आणि माजलगाव येथे प्रत्येकी ३० मिमी, तर वाशी आणि धारूर येथे २० मिमी पाऊस झाला.
सध्या विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता कायम असून नागपूर (४३.२), वर्धा (४२.५), अकोला (४२.३), अमरावती (४२.२), गोंदिया (४२.२), यवतमाळ (४२.२) आणि ब्रह्मपुरी (४२.०) या ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
