सोयाबीन उगवण न होण्यामागे बियाणे की पाऊस? तज्ज्ञांनी सांगितले खरं कारण | Soybean Germination SIAM

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांत सोयाबीन (Soybean Germination) बियाण्यांची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून खासगी बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, राज्य शासनानेही काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ बियाण्यांचा दोष म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सीड इंडस्ट्री असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (SIAM) यांनी व्यक्त केले आहे.

यंदा हवामान तज्ज्ञांनी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मॉन्सून अनियमित राहण्याची शक्यता आधीच वर्तविली होती. याच कारणामुळे मुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच सीयामने शेतकऱ्यांना ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करण्याचा सल्ला दिला होता. कारण सोयाबीनच्या उगवणीवर केवळ बियाण्याची गुणवत्ता परिणाम करत नाही, तर जमिनीतील ओलावा, तापमान, पेरणीची खोली, पावसाचे वितरण आणि इतर अनेक कृषी तांत्रिक बाबींचाही थेट परिणाम होत असतो.

मात्र यंदा मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत होते. पहिला पाऊस पडताच अनेकांनी पेरणी केली. त्या वेळी जमिनीचे तापमान जास्त होते आणि पेरणीनंतर लगेच पुरेसा पाऊसही झाला नाही. परिणामी काही भागांत सोयाबीनची उगवण कमी झाल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत केवळ बियाण्यांनाच जबाबदार धरणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांच्या मते बियाण्यांची उगवण ही अनेक परस्पर संबंधित घटकांवर अवलंबून असते. बियाण्यांची वाहतूक, साठवणूक, विक्रीदरम्यानची हाताळणी, जमिनीतील आर्द्रता, पेरणीनंतर पडलेला पाऊस, पेरणीची खोली, जमिनीचा प्रकार, निचरा, बियाण्यांवर बुरशीनाशक प्रक्रिया न करणे, रासायनिक खतांचा अतिरेक, हवामानातील बदल आणि स्थानिक कृषी परिस्थिती यांचा उगवणीवर मोठा परिणाम होतो.

सोयाबीन बियाण्यांची रचना इतर पिकांपेक्षा वेगळी असते. बियाण्यावरील डोळा किंवा अंकुराचा भाग अत्यंत नाजूक असतो. वाहतूक, साठवणूक किंवा अयोग्य हाताळणीदरम्यान हा भाग खराब झाल्यास उगवण क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे कंपनीमधून गुणवत्तापूर्ण बियाणे बाहेर पडले असले, तरी पुढील टप्प्यातील चुकीच्या हाताळणीमुळेही नुकसान होऊ शकते.

विशेष म्हणजे, ही समस्या नवीन नाही. सन २०११ मध्येही महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीत इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेचे तसेच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांचा समावेश होता. समितीच्या अहवालानंतर शासनाने २२ नोव्हेंबर २०१२ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

त्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे, बियाण्यांवर बुरशीनाशक, रायझोबियम आणि पीएसबीची प्रक्रिया करणे तसेच पेरणीची खोली ३ ते ५ सेंटीमीटर ठेवणे यांचा समावेश होता. समितीने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले होते की, अपुरी आर्द्रता, खोल पेरणी, बियाण्यांची अयोग्य साठवणूक, अनियमित पाऊस आणि प्रक्रिया न केलेली बियाणे ही उगवण कमी होण्यामागील प्रमुख कारणे आहेत. या निष्कर्षामध्ये बियाण्यांच्या गुणवत्तेला थेट दोष देण्यात आलेला नव्हता.

उगवण कमी होण्यामागील प्रमुख कारणे : Soybean Germination SIAM

घटकसंभाव्य परिणाम
अपुरा किंवा विलंबाने झालेला पाऊसउगवण कमी होणे
जमिनीतील कमी आर्द्रताअंकुरणावर विपरीत परिणाम
जास्त खोलीवर पेरणीरोपे बाहेर येण्यास अडथळा
बियाण्यांवर प्रक्रिया न करणेरोगांचा प्रादुर्भाव वाढणे
अयोग्य वाहतूक व साठवणूकअंकुरशक्ती कमी होणे
हवामानातील अनियमितताउगवणीत असमानता

हेही वाचा : पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण | Goat Farming Enterotoxemia

देशातील पहिले ‘गो-पर्यटन केंद्र’ होणार विकसित; देशी गोवंश संवर्धनाला मिळणार नवी दिशा | Indigenous Cattle

बियाणे उद्योग हा देशातील सर्वाधिक नियमन असलेल्या क्षेत्रांपैकी एक मानला जातो. Seeds Act, 1966, Seeds Rules, 1968 आणि Seeds (Control) Order, 1983 अंतर्गत बियाण्यांचे उत्पादन, गुणवत्ता आणि विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवले जाते. राज्यात तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत गुणवत्ता नियंत्रणाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून, नियमितपणे बियाण्यांचे नमुने तपासले जातात. गुणवत्तेत दोष आढळल्यास संबंधित बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची तरतूदही आहे.

सीड इंडस्ट्री असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे म्हणणे आहे की, दोषी कोणताही घटक असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, काही घटनांच्या आधारावर संपूर्ण बियाणे उद्योगावर संशय घेणे योग्य नाही. महाराष्ट्रातील अनेक नामांकित कंपन्या गेल्या अनेक दशकांपासून अधिक उत्पादन देणारे, रोगप्रतिकारक आणि बदलत्या हवामानाला तोंड देणारे वाण विकसित करण्यासाठी सातत्याने संशोधन करत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, यंदा केवळ खासगी कंपन्यांच्या बियाण्यांबाबतच नव्हे, तर महाबीज आणि शासनामार्फत वितरित करण्यात आलेल्या काही बियाण्यांबाबतही उगवणीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे ही समस्या केवळ एखाद्या कंपनीपुरती मर्यादित नसून, हवामान आणि इतर नैसर्गिक तसेच कृषी तांत्रिक घटकांचाही त्यामागे मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते.

शेतकरी आणि बियाणे उद्योग यांचे नाते हे केवळ ग्राहक आणि विक्रेता यापुरते मर्यादित नाही. बीजोत्पादन करणारे शेतकरी, संशोधक, कृषी तज्ज्ञ आणि बियाणे उद्योगातील अनेक घटक थेट शेतीशी जोडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान म्हणजे उद्योगाचेही नुकसान आहे.

आज गरज आहे ती दोषारोपांच्या राजकारणाची नव्हे, तर विश्वासाची पुनर्बांधणी करण्याची. शेतकरी, शासन, कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि बियाणे उद्योग यांनी समन्वयाने काम केल्यास केवळ सध्याच्या उगवणीच्या समस्येवरच नव्हे, तर भविष्यात अशा घटनांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा