किसानवाणी | आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकार आपल्या बजेट मध्ये मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने अशा परिस्थितीत यावर्षी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार निवडणुकीआधी केंद्र सरकार महिला शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी दुप्पट करू शकते. तर काही रिपोर्टनुसार शेतकऱ्यांच्या निधीत 2000 रूपयांची वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढवू शकते (PM Kisan)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार महिला शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. जी रक्कम आताच्या तुलनेत दुप्पट आहे. 1 फेब्रुवारीला सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानंतर निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या आधी महिलांसाठी ही मोठी घोषणा होऊ शकते. यामुळे सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 120 अब्ज रुपयांचा बोजा पडू शकतो.
शेतकऱ्यांना आरोग्य आणि जीवन विमा यासारख्या सुविधा
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे ही म्हटले आहे की, सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये (PM Kisan) दोन हजारांची वाढ करू शकते. म्हणजेच शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून वर्षाला एकूण 8000 रुपये मिळतील. याशिवाय शेतकऱ्यांना आरोग्य आणि आयुर्विमा यासारख्या सुविधाही दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्र सरकार आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी काही मोठ्या घोषणा करु शकते. या अंतरिम अर्थसंकल्पात, पीएम स्वानिधी अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांचाही समावेश करायचा आहे आणि सरकार विविध व्यावसायिकांसाठी विश्वकर्मा योजनाही आणणार आहे, ज्याद्वारे महिलांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल. काही दिवसांपूर्वीच लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना शेतीसाठी ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.