महाराष्ट्रात परतीच्या पावसाच्या सरी काही भागांत हजेरी लावत(Maharashtra Weather 2026)असल्या तरी राज्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच हवामानशास्त्र विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता असून काही भागांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
आज मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, पुणे, पुणे घाटमाथा, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
| पावसाचा अंदाज | जिल्हे |
|---|---|
| जोरदार पाऊस, येलो अलर्ट | रायगड, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, लातूर, नांदेड, गडचिरोली |
| विजांसह पाऊस | मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, पुणे, पुणे घाटमाथा, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया |
| हलक्या सरी | पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव |
हेही वाचा : White Grub Control in Sugarcane | उसातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण; अळीमुळे मुळे कुरतडली जात असल्याने वेळीच उपाययोजना गरजेच्या
Tomato Disease Management | टोमॅटोवरील करपा आणि फळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढला; वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करा
दरम्यान, उद्या म्हणजे बुधवारी काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती आणि भंडारा या भागांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. जळगाव, धुळे, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरूच
नैऋत्य मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची स्थिती आज ‘जैसे थे’ असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. मॉन्सूनच्या परतीची सीमा जैसलमेर, नागौर, सिकर, रोहतक, पतियाळा आणि गुरुदासपूर या भागात कायम आहे. पुढील दोन दिवसांत पंजाबचा उर्वरित भाग, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, राजस्थानचा आणखी काही भाग, सौराष्ट्र-कच्छ, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत ताशी 18 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. हे क्षेत्र ओडिशातील गोपालपूरपासून सुमारे 200 किलोमीटर आग्नेयेला, आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून 200 किलोमीटर पूर्व-आग्नेयेला, ओडिशातील पुरीपासून 210 किलोमीटर दक्षिणेला आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून 290 किलोमीटर पूर्वेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील 12 तासांत पश्चिम-वायव्य दिशेने सरकून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून, 23 सप्टेंबरच्या रात्री ते 24 सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान विशाखापट्टणम आणि गोपालपूरदरम्यान उत्तर आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
