किसानवाणी | जगभरातील नवनवीन कृषी तंत्रज्ञान व बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी सन २००४ पासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी परदेश दौरे आयोजित केले जातात. ही योजना कृषी विभाग राबवित असून त्याअंतर्गत प्रस्तावित खर्चाच्या सुमारे एक कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चाला कृषी विभागाने अध्यादेशाद्वारे मान्यता दिली आहे.
Foreign study tours for Maharashtra farmers
कृषी विभागाच्या या योजनेमुळे राज्यातील सुमारे १२० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर या अभ्यास दौऱ्यात 6 अधिकारी देखील सहभागी असतील. यापूर्वी ही योजना वारंवार बंद पडल्याने शेतकऱ्यांनी ती सुरू करावी अशी मागणी केली होती. ही योजना राबविण्याकरिता संचालक (विस्तार व प्रशिक्षण) तथा राज्य नोडल अधिकारी यांच्यावर जबाबदारी असेल. या संदर्भाची सूचना कृषी विभागाने लवकरच काढावी अशीही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/कृषि मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषि माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर/शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन तसेच क्षेत्रिय भेटी, संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.
सन २००४-२००५ पासून सदर योजना सुरु आहे. खर्चाची मान्यता दरम्यान ‘राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता रु. २ कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. मात्र वित्त विभागाने या खर्चाच्या ७० टक्के निधीस मान्यता दिली आहे. या संदर्भात राज्याच्या कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी २ जानेवारी २४ रोजीच्या प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सन २०२३-२४ मध्ये या योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
पात्रता –
शेतकऱ्याच्या नावे ‘सातबारा’, आठ ‘अ’चा उतारा असावा तसेच त्याचे वय २१ ते ६२ च्या दरम्यान असावे. संबंधित शेतकऱ्याकडे पासपोर्ट असावा. तसेच तो शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा. संबंधित शेतकऱ्याने पूर्वी शासकीय योजनेच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा. तसेच संबंधित शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट आवश्यक आहे.
कुठे संपर्क साधावा?
परदेश दौऱ्यासंदर्भात कृषी विभाग लवकरच अधिकृत पत्राद्वारे जाहीर सूचना देणार असून. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण यांच्याशी संपर्क साधता येईल.