बातम्या

शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने | Farmers Long March

मुंबई | राज्य सरकार आणि केंद्र सकारही अनेकदा शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करते, आश्वासनेही देते. मात्र केलेल्या घोषणांची आणि दिलेल्या आश्वासनांची क्वचितच पूर्तता होते. अशा वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. (Farmers Long March)

शेतकऱ्यांना पुन्हा आहे त्याच प्रश्नांशी लढावे लागते. गेल्या काही दिवसांपासून कांदा, द्राक्षे आणि इतर शेतीमालाचे दर सातत्याने कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र लक्ष देण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणींकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक ते मुंबई असा शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च काढण्यात आला आहे. या लाँग मार्च मध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसोबत इतरही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या लाँग मार्चचे नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले हे करत असून तीन ते चार दिवसांत हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारची होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक होणार होती. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी नेते संतप्त झाले आहेत.

दरम्यान, दिंडोरी येथून निघालेला लॉन्ग मार्च आता घोटी शहरापर्यंत पोहोचला आहे. मार्चने काल नाशिक शहराजवळी आरोग्य वित्रान विद्यापीठात मुक्कामी होता. आता हा मोर्चा पुढे निघाला असून घोटी शहरापर्यंतचे सुमारे 66 किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर कापले आहे. मार्चचा आजचा सलग तिसरा दिवस आहे.सायंकाळ होताच आजचा मोर्चा घोटी शहराजवळ विसावणार आहे. उन,वारा, पाऊस आणि पायाखाली तापलेली जमीन याचा काहीही विचार न करता हे पाय मुंबईच्या दिशेने पावले टाकत आहेत.

Back to top button