कमी भांडवलात घरच्या घरी करा केळी चिप्स व्यवसाय, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Banana Wafers Small Scale Industry
डॉ. शहाजी कदम, डॉ. शिवम साळुंके
Banana Wafers Small Scale Industry : जागतिक क्रमवारीत केळी उत्पादनात भारताचा क्रमांक पहिला असून, एकूण जागतिक उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन होते. राष्ट्रीय स्तरावर एकूण ५.२० दशलक्ष टनांसह महाराष्ट्राचा केळी उत्पादनात तमिळनाडू, गुजरातनंतर तिसरा क्रमांक लागतो. भारतात एकूण उत्पादित केळीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक वापर ताजे फळ म्हणून केला जातो. ४ ते ५ टक्के केळीवर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे केळी नाशवंत होण्याचे प्रमाण ही अधिक आहे. म्हणूनच केळीच्या प्रक्रियेला मोठा वाव आहे.
सध्या दक्षिण भारतात पिकवल्या जाणाऱ्या पिष्टमय प्लँटिन जातीच्या समूहगटातील ०.३ दशलक्ष टन केळीपासून चिप्स तयार केले जातात. त्यातून १२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके परकीय चलन मिळते. जळगाव जिल्ह्यात एकूण ९० नोंदणीकृत केळी चिप्स युनिट असून, अनोंदणीकृत ६०० पेक्षा अधिक युनिट असल्याचे सांगितले जाते. सध्या ब्रॅण्डेड कंपन्या केळी चिप्स उद्योगामध्ये फारशा दिसत नाहीत. त्यामुळे स्पर्धा कमी असून, शेतकऱ्यांना उत्तम संधी आहेत.
केळी वेफर्स लघूउद्योगासाठी आवश्यक यंत्रे
केळी धुण्याची टाकी : कच्ची केळी तोडून आणल्यानंतर पुढील प्रक्रियेपूर्वी फळे पाण्याने स्वच्छ धुतली जातात. त्यासाठी उथळ अशा टाकीची आवश्यकता असते. केळी स्वच्छ करण्यासाठी खास स्टेनलेस स्टिलपासून बनवलेले यंत्र उपलब्ध आहे. ते जमिनीवर ठेवण्यासाठी बेस तयार केलेला असतो. या यंत्राचा आकार हा ३ बाय २ फूट इतका असून, वजन ३५ किलो असते. त्यात एका वेळी १०० किलो केळी धुणे शक्य होते. या यंत्रांची किंमत ही ३० हजारांपासून सुरू होते.
साल काढणे : कच्च्या केळीची साल काढणे, ही बाब अधिक कष्टाची ठरते. सध्या त्यासाठी कोणतेही यंत्र उपलब्ध नाही. मजूर स्टेनलेस स्टीलच्या चाकूने साल काढतात. याला वेळही अधिक लागतो.
पॅकेजिंगसाठी लागणारी यंत्रे : यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित आणि हाताने चालवायची सीलिंग यंत्रे यांचा समावेश आहे. आपल्या मागणीनुसार त्यांचा वापर करता येतो. वेफर्स (चिप्स) हे कुरकुरीत राहण्यासाठी उत्तम दर्जाचे प्लॅस्टिक व हवाबंद पॅकिंगची आवश्यकता असते. सामान्यतः प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग करून त्याचे सीलिंग केले जाते.
सीलिंग यंत्रामध्ये हीटिंग कॉइल बसवलेली असते. सिंगल फेजवर चालणाऱ्या या यंत्राचे वजन ३ किलोपर्यंत असते. प्रति तास ८० ते १०० किलो या प्रमाणे पॅकेजिंग करता येते. लहान सीलिंग यंत्राची किंमत २५०० रुपयांपासून पुढे आहेत. यामध्ये स्वयंचलित यंत्र उपलब्ध असून, त्याच्या किमती ६० हजार रुपयांपासून सुरू होतात.
काप करण्याचे यंत्र (बनाना स्लायसर) : या यंत्रामध्ये साल काढलेली केळी टाकली जातात. पुढे एका फिरत्या चकतीवर धारदार ब्लेड्स लावलेले असतात. ब्लेड्च्या प्रकारानुसार गोल काप, रेषा असलेले उभे काप तयार करता येतात. या यंत्राचे बहुतांश भाग हे स्टेनलेस स्टील व ॲल्युमिनिअमचे असून, काही भाग माइल्ड स्टीलचे (एम.एस.) असतात.
या स्वयंचलित यंत्राचे वजन ७० किलो असून, ते सिंगल फेज, १०० ते २२० व्होल्टवर चालते. यंत्राची पाती १४४० फेरे प्रति मिनिट वेगाने फिरतात. १५० किलो प्रति तास या प्रमाणात काप तयार केले जातात. या यंत्राची किंमत ३५ हजारांपासून पुढे आहे.
तळण यंत्र (चिप्स फ्रायर) : तळण यंत्रामध्ये तेल गरम करण्यासोबत सातत्याने फिरते ठेवले जाते. त्यामुळे तेल लवकर खराब होत नाही. चिप्स तळतेवेळी तळाशी जमा होणारा गाळ किंवा अन्य पदार्थ काढण्याची सुविधा असते. हे यंत्र संपूर्ण स्वयंचलित असून, स्टेनलेस स्टीलपासून बनवले जाते.
त्यात तेलाचे तापमान दर्शविणारे इलेक्ट्रिक पॅनेल बोर्ड दिले असून, तापमान नियंत्रकही दिले आहे. या यंत्राची क्षमता प्रति तास ५० ते ११० किलोपर्यंत वेगवेगळी असू शकते. यंत्राचे वजन ८० किलो असून, किंमत ५० हजारांपासून पुढे आहे. इंधनाच्या प्रकारानुसार इलेक्ट्रिक, डिझेल किंवा गॅस यावर हे यंत्र उपलब्ध आहेत.
मसाले मिसळण्याचे यंत्र – (चिप्स फ्लेवरिंग / मिक्सिंग मशिन)
तळलेल्या केळी चिप्सवर मीठ, मसाला किंवा विविध स्वाद घटक टाकले जातात. त्यासाठी खास मसाले मिसळण्याचे यंत्र विकसित केले आहे. त्यात पॅनच्या एका बाजूला एका लहान होल्ड सिलिंडरद्वारे चिप्सवर मसाले शिंपडले जातात. ते फिरविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पाते बसवलेले असून, चिप्सचा चुरा न होता चिप्स फिरवले जातात. स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या या यंत्राची क्षमता प्रति तास ६० किलो आहे. त्याला ०.५ अश्वशक्तीची विद्युत मोटार जोडलेली असून, सिंगल फेज व २२० व्होल्ट ऊर्जा लागते. यंत्राचे वजन १५० किलो असून, त्याची किंमत ६५ हजारांपासून पुढे आहेत.
५० किलो केळी चिप्स बनवण्याचा खर्च
५० किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत कमी १२० किलो कच्ची केळी लागतात. त्याची किंमत ३६०० रुपये (अंदाजे) धरल्यास चिप्स तयार करण्यासाठी १० ते १५ लिटर तेल लागते. १६० रुपये प्रमाणे त्याचे २४०० रुपये होतील. चिप्स फ्रायर मशिनला १ तासात १० ते ११ लिटर डिझेल लागते.
१ लिटर डिझेल ९५ रुपये प्रमाणे धरल्यास १०४५ रुपये लागतील. मीठ आणि मसाले ३५० रुपये, या प्रमाणे धरल्यास ७३९५ रुपयांमध्ये ५० किलो चिप्स तयार होतील. त्यात मजुरी व पॅकेजिंगच्या प्रकारानुसार खर्च गृहित धरल्यास १० ते ११ हजार रुपये खर्च होईल. सध्या बाजारात केळीचे चिप्स ५०० ते ७०० रूपये आहे. अर्थात ५० किलो चिप्सपासून किमान २५ हजार उत्पन्न मिळेल. स्वतःची जागा व १२ बाय १२ फुटांची एखादी खोली असल्यास २ लाख रुपयांमध्ये केळी चिप्स निर्मितीचा व्यवसाय सहजपणे उभारता येईल.