बातम्याहवामान

द. आशियात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान, महाराष्ट्राची स्थिती काय? जाणून घ्या! Rain Forecast 2024

पुणे | भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) हे पूर्वानुमान वर्तविण्यात आले आहे. दक्षिण आशियाच्या अति उत्तरेकडील भाग, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता सॅस्कॉफ ने वर्तवली आहे.

२०२३ मधील मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि पुढील हंगामातील (२०२४) अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियायी देशांच्या फोरमची तीन दिवसीय बैठक २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भारतासह, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांसह जागतिक हवामान संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या मध्यम ‘एल-निनो’ स्थिती आहे. जागतिक हवामान प्रारूपाच्या निरिक्षणांनुसार यंदाच्या मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला ‘एल-निनो’ स्थिती निवळून समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य स्थितीत येणार आहे. तर, मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. मात्र ‘ला-निना’ची तीव्रता आणि वेळ याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ‘एल-निनो’ आणि ‘ला-निना’ स्थितीचा दक्षिण आशियातील मॉन्सूनवर प्रभाव पडतो. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान प्रारूपांच्या माध्यमातून उपलब्ध माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकाचा (द्विधृविता) (इंडियन ओशन डायपोल -आयओडी) मॉन्सूनच्या पावसावर विशेष परिणाम होतो. सध्या दक्षिण हिंद महासागरात आयओडी स्थिती सर्वसाधारण आहे. तर, मॉन्सूनहंगामाच्या अखेरच्या टप्प्यात ही स्थिती धन (पॉझिटिव्ह) होण्याची शक्यता आहे. धन आयओडी स्थिती दक्षिण आशियात अधिक पावसासाठी पोषक ठरते.

मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) तापमानाचा अंदाजही सॅस्कॉफच्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण आशियाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. तर, दक्षिण आशियाचा उत्तर, उत्तर-पूर्व, पूर्व आणि दक्षिणेकडील काही भाग वगळता बहुतांश कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज

‘सॅस्कॉफ’मार्फत मॉन्सून पावासाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा पावसाचे प्रमाण सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक असल्याचे या नकाशावरून दिसत आहे.

Back to top button