पशुधन

Poultry Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्याच्या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कोंबड्या उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तोंडावाटे शरीरातील उष्णता बाहेर टाकतात. याचा विपरीत परिणाम वाढ, रोगप्रतिकार क्षमता आणि उत्पादनावर होतो.

डॉ. मुकुंद कदम, डॉ. दर्शना भैसारे, डॉ.अर्चना कदम

Poultry Farming : ग्रामीण भागात उपजीविकेमध्ये कुक्कुटपालन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. हवामानातील बदलाचे परिणाम कुक्कुटपालन क्षेत्रामध्येही दिसत आहेत. या बदलांमुळे अंडी, चिकन उत्पादनावर परिणाम होत आहे.

कुक्कुटपालनात सर्वाधिक खर्च हा खाद्यावर होतो. हे खाद्य मका, सोयाबीनपासून तयार केले जाते. हवामानातील बदलामुळे अनेक ठिकाणी मका व सोयाबीन उत्पादनात घट येत आहे. तयार झालेल्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहत नाही. आर्द्रतेमुळे मक्यामध्ये ॲफ्लाटॉक्सिनची निर्मिती होते.

वाढत्या दरामुळे कुक्कुटपालनातील खर्च वाढला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक पोल्ट्री फार्म उन्हाळ्यात बंद ठेवले जातात. त्यामुळे पोल्ट्री शेडच्या जवळ जल संधारण, पाणी पुनर्भरणाच्या उपाययोजना आवश्यक झाल्या आहेत.

वाढत्या तापमानाचा परिणाम

हवामान बदलामुळे तापमान वाढले आहे, उन्हाळा अधिक काळ लांबला आहे. वाढीव तापमानामुळे कोंबड्यांमधील मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. पोल्ट्री शेडमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेले, की कोंबड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे होते. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे ठरते.

अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे आजूबाजूच्या वातावरणात बदल होतो. त्याचा कमी अधिक प्रमाणात कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दरवर्षी कोंबड्यांना काही विशिष्ट आजार ठराविक वातावरणात होतात, अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे विषाणू, जिवाणू सक्रिय होतात.

अनेक वेळा हवामान बदलामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते. कोंबड्यांच्या आरोग्यासाठी अधिक तापमान व अधिक आर्द्रता जास्त घातक ठरते. अनेक खासगी कंपन्या हवामानातील बदलामुळे वातानुकूलित शेड बांधणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहेत. कोंबड्यांच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. तसेच जैवसुरक्षा देखील महत्त्वाची ठरते.

बदलत्या हवामानात कोंबड्याच्या आनुवंशिकतेमध्ये बदल करून काही विशिष्ट जाती निर्माण करता येऊ शकतात का, याबाबत संशोधन सुरू आहे. नेकेड नेक व फ्रिझल जीनचा उपयोग, कोंबड्यांच्या ब्रीडिंग प्लॅनमध्ये बदल, उष्णकटिबंधीय हवामान सहन करू शकणारे जनुकीयदृष्ट्या सुधारित कोंबड्यांच्या जातीचे प्रजनन करणे हे बदलत्या हवामानाच्या टप्प्यात अतिशय महत्त्वाचे आहे. उष्णता सहन करणाऱ्या जाती विकसित कराव्या लागणार आहेत. याचबरोबरीने रोगप्रतिकारक, वाढीचा चांगला दर आणि उत्पादन सुधारणे हा बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्याचा एक मार्ग आहे.

मोबाइलमधून वेगवेगळ्या अॅपवर हवामानाचा अंदाज दिला जातो. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा.

डॉ. मुकुंद कदम, ८८८८८३६३७४ (प्राध्यापक व विभाग प्रमुख, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशू वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)


Poultry Management : कोंबड्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

डॉ.आर.सी.कुलकर्णी, डॉ.के.वाय. देशपांडे

Summer Poultry Management ऋतूमधील बदलानुसार हवामानात देखील बदल (Climate Change) होतात, त्या अनुषंगाने हवामानाला अनुसरून कुक्कुटपालन व्यवस्थापनात (Poultry Management) बदल करावे लागतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे हवामान उष्ण प्रकारचे आहे.

त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार-पाच महिन्याच्या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

याचे आर्थिक कारण असे की होळीच्या सणानंतर संपूर्ण उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दराने (Chicken Sale) विक्री होते. हा काळ नफा कमवण्याचा असला तरी उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी व मांस उत्पादनात (Chickens Meat Production) घट दिसून येते. व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्यांचे सामान्य शरीर तापमान मूलतःच अधिक (१०३ ते १०७ डिग्री फॅरानाईट) असते.

कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु ते २८ ते ३० अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतात. त्यांच्या उत्पादनात फारसा फरक पडत नाही.

परंतु ३० अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास त्याचा त्यांच्या उत्पादन आणि प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. बाह्य तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास प्रति अंश तापमान वाढीने ५ टक्के उत्पादन घट होते.

महाराष्ट्राचा विचार करता विदर्भ व मराठवाड्यात उन्हाळ्यातील कमाल तापमान मागील काही वर्षात ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे.

कोंबड्या उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तोंडावाटे शरीरातील उष्णता बाहेर टाकतात यालाच धापणे (पॅंटिंग) म्हणतात. याचा विपरीत परिणाम वाढीवर, रोगप्रतिकार क्षमतेवर आणि उत्पादनावर होतो.

योग्य व्यवस्थापन न केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन ४२ दिवस वय होऊनही वाढत नाही. मोठ्या कोंबड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण अधिक होते. हे संभावित नुकसान टाळण्यासाठी व कोंबड्यांची अक्षम शरीर तापमान नियंत्रण प्रणाली विचारात घेता विशेष लक्ष देऊन काळजी घेणे गरजेचे ठरते.

कोंबड्यामध्ये दिसणारी उष्माघाताची लक्षणे

 1. कोंबडी श्वास तोंडावाटे घेतात,पाणी जास्त पितात. भूक मंदावते.
 2. तोंडाची उघडझाप करून धापा टाकतात,पोट जमिनीला घासतात.
 3. डोळे बंद करतात, हालचाल मंदावते. सुस्त राहतात.
 4. अंडी उत्पादनात घट होते. अंड्याचे वजन कमी होते.
 5. अंड्याच्या बाहेरील कवचाची गुणवत्ता कमी होते. शारीरिक वजनात लक्षणीय घट होते.
 6. मांसल कोंबड्यांचे वजन कमी होते. प्रजोत्पादन यावर उष्णतेचा विपरीत परिणाम होतो.
 7. रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे च्या आजारास बळी पडतात.
 8. खाद्याचे मांस किंवा अंड्यामध्ये रूपांतर क्षमता कमी होते.
 9. काही कोंबड्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात. पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकवून बसतात
 10. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी व शरीरात थंडपणा आणण्यासाठी कोंबड्या पंख शरीरापासून दूर पसरवितात.
 11. त्वचा रखरखीत होते. रंगामध्ये बदल दिसून येतो.
 12. दीड किलो पेक्षा अधिक वजनाच्या कोंबड्यांना दुपार ते संध्याकाळच्या वेळी ताप येतो, लालसर होऊन मरण पावतात.

उपाययोजना

 1. शेड बांधताना घराची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी.वायुवीजन व्यवस्था सक्षम असावी.
 2. उन्हाळ्यात गादीसाठी लाकूड भुश्याऐवजी तांदळाचा तूस किंवा भुईमूग टरफलांचा वापर करावा.
 3. गादी पद्धतीत वापरात येणाऱ्या तुसाची जाडी कमी (१ ते १.५ इंच) करावी.
 4. शेडमध्ये संख्या किमान १० टक्क्यांनी कमी करावी.
 5. कोंबड्यांना थंड, स्वच्छ, ताजे पिण्यायोग्य पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे.
 6. पिण्याच्या पाण्याची भांडी संख्या दुप्पटी पर्यत वाढवावी.
 7. क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करावा, यामुळे पाण्यातून होणारे आजार टाळता येतील.
 8. पिण्याच्या पाण्यामधून जीवनसत्त्व (क व ई), सेलेनीअम आणि इलेक्ट्रोलाइट यांचा वापर करावा. त्यामुळे उष्णतेचा ताण कमी होईल.
 9. पिण्याचे पाणी पुरवणारी टाकी शेडमध्ये विशिष्ट उंचीवर बसवावी अथवा बाहेरच्या बाजूस बसवली असेल तर त्यास बारदानाची पोती गुंडाळून त्यावरती थंड पाणी टाकावे जेणेकरून आतील पाणी थंड राहण्यास मदत होईल.
 10. टाकीतून भांड्यांपर्यंत जाणारी पाइपलाइन देखील शेडच्या आतमधूनच असावी, जेणेकरून भांड्यात पोहोचणारे पाणी थंड राहते.
 11. शेडमधील कामे सकाळीच उरकून घ्यावीत, दुपारच्या वेळेत कोणतीही कामे करू नयेत जेणेकरून त्याचा ताण कोंबडीवर पडणार नाही.
 12. लसीकरण सकाळी ८ च्या अगोदर अथवा संध्याकाळी ७ नंतर करावे.
 13. खाद्य देण्याचे एक वेळापत्रक ठरवून घ्यावे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
 14. कोंबडीचे वजन १.५ किलो च्या आसपास झाल्यावर त्यांना दुपारच्या (११ ते ५) वेळेत खाद्य देऊ नये. त्याकरिता खाद्य भांडी वरती करून ठेवावीत.
 15. खाद्य दिल्यानंतर साधारणतः अर्धा ते दीड तासात कोंबड्यांच्या शरीर तापमानात वाढ होते. यामुळे त्यांच्यावरील उष्णतेचा ताण वाढतो, म्हणून दुपारचे खाद्य देणे टाळावे.
 16. मांसल कोंबडी खाद्यात मुख्य ऊर्जा स्रोत म्हणून वनस्पती तेलाचा ४ ते ५ टक्के या प्रमाणात वापर करावा.
 17. अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्यात खाण्याचा सोडा वापरावा.
 18. अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्य भांड्यात टाकलेल्या खाद्य पृष्ठभाग यावरती शिंपले अथवा मार्बलचे तुकडे थोड्या प्रमाणात पसरावेत.
 19. शेडमधील बल्ब किंवा ट्यूबलाइट्स रात्रीच्या १ ते २ तासापर्यंत लावून कोंबड्यांना थंड वातावरणात खाद्य खाण्यास प्रोत्साहित करावे.
 20. शेडच्या सभोवताली उंच व सरळ जाणारी झाडे (उदा. अशोका) लावावीत.
 21. स्प्रिंकलर्स छतावर आणि फॉगर्स शेडमध्ये बसवावेत. स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स यांचा वापर हा सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान दर १ ते २ तासांनी करावा.
 22. बाजुभिंतीच्या जाळीवर बारदान पोती लावावीत व त्यावर स्प्रिंकलर्सचे पाणी पडेल याची सोय करावी.
 23. शेडनेटचा वापर देखील करता येतो.
 24. शेडमध्ये कुलर किंवा पंखा याचा वापर करणेही योग्य राहते, परंतु कुलर मध्ये संपूर्ण दुपारभर पाणी आहे हे वेळोवेळी निश्चित करावे. तसेच कुलरमुळे निर्माण होणारी अधिकच्या आर्द्रतेचे वायुवीजन योग्य रीतीने होईल हे निश्चित करावे.
 25. शेडच्या छतावर वेलवर्गीय वनस्पती जसे की, दोडके, कारले वेलीचे आच्छादन फायद्याचे ठरू शकते.
 26. छतावर सूर्यप्रकाश परावर्तीत करणाऱ्या पत्र्यांचा वापर करावा जेणेकरून शेडच्या आतील तापमान कमी राखण्यास अधिक मदत होते.
Back to top button