योजना

शेतमालाचं निर्यातदार होऊन मिळवा परकीय चलन, राज्याचं पणन महामंडळ देतंय प्रशिक्षण.. वाचा सविस्तर | Agri Exporter

किसानवाणी | राज्यात फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकरी निर्यातक्षम फळांचे उत्पादन घेतात. त्यामुळे या फळांच्या निर्यातीसाठी (Agri Exporter) राज्य सरकारच्या पणन महामंडळाने शेतमाल निर्यातदार घडवण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पणन महामंडळाकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.

प्रशिक्षणाचा उद्देश (Agri Exporter Panan Corporation Provides Training)

शेतमालाची निर्यात (Agri Exporter) वाढवण्यासाठी नवीन निर्यातदार घडवणे, त्यातून शेतमालाची निर्यात वाढवणे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळवून देणे, याशिवाय निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणे हा या निर्यात प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पणन महामंडळाकडून कृषी मालाच्या निर्यात प्रशिक्षणासाठी वयाची कोणतीही अट आणि पात्रता ठेवण्यात आलेली नाही. कोणत्याही वयोमर्यादेतील व्यक्ती या प्रशिक्षणास पात्र असणार आहे. पणन महामंडळाच्या पुण्यातील गुलटेकडी येथील प्रमुख कार्यालयात हे प्रशिक्षण असणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींची त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे.

प्रशिक्षणात काय माहिती मिळेल?

हे पाच दिवसांचे प्रशिक्षण असून, ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतले जाणार आहे. यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना प्रामुख्याने ताजी फळे व भाजीपाला निर्यात संधी, पणन मंडळाचे कार्य, इनकॉईस, पॅकिंग लिस्ट, शिपिंग बिल इ. कागदपत्रांची तोंड ओळख, प्रमुख पिकांची निर्यातीसाठी गुणवत्ता मानके, कृषिमालाची वाहतूक व पुरवठा यंत्रणा (स्थानिक, आंतरदेशीय, आंतरराष्ट्रिय) (SCM), निर्यातीसाठी APEDA, DGFT, MSAMB व शासनाच्या योजना, फळे व भाजीपाल्यावर विशेष प्रक्रिया पद्धती, कृषि क्षेत्रामध्ये ब्रडिंगचे महत्व, बैंकिंग टमिनॉलॉजीज, बैंकिग प्रक्रिया, पेमेंट रिस्क, सुविधा केंद्र गरज (IFC, VHT, HWIT, VPF), उत्पादनांचा अभ्यास, एच. एस. कोड, आंतरराष्ट्रीय परिस्थिती व पणन, करार शेती व पणन कायद्यातील बदलामुळे पणन संधी, निर्यात प्रक्रिया, परवाने, नोंदणी व विमा आदींची माहिती दिली जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी शुल्क किती असेल?

सदरच्या 5 दिवसांच्या निर्यात प्रशिक्षणात सहभागी व्हायचे असल्यास इच्छुकांना शुल्क भरणा करावा लागेल. यामध्ये प्रशिक्षण अधिक पाच दिवस राहण्याची सोय असे मिळून 11,500 रुपये भरावे लागतील. या 11,500 रुपयांमध्ये पाच दिवस जेवण, चहा, नास्ता यासहित प्रशिक्षण साहित्य दिले जाणार आहे. याशिवाय प्रशिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या अनिवासी प्रशिक्षणार्थींना 9635 रुपये आणि महिलांसाठी 8638 रुपये शुल्क असणार आहे.

प्रशिक्षणासाठी कुठे संपर्क कराल?

जर तुम्हाला या निर्यात प्रशिक्षणात सहभागी व्हायचे असेल तर, तुम्ही महाराष्ट्र पणन मंडळाच्या पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता. शैलेंद्र जाधव, समन्वयक (9403761267), विराज पाटील – 8788873753 किंवा पणन महामंडळाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 0244.

Back to top button