लसणाच्या दरात तेजी, 10 किलो लसूणाला 2800 रूपयांचा दर; भाव वाढण्याचं कारण काय? | Garlic Price
किसानवाणी | Garlic Price : लसणाच्या दरात झपाट्याने वाढ सुरूच आहे. भुवनेश्वरच्या (Bhubaneswar) बाजारात लसणाचे दर (Garlic Price) हे 400 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये लसूणाचे दर सध्या 1000 ते 2800 रूपये प्रति दहा किलोवर पोहचले आहेत. अनेक भागात लसणाच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याने लसणाच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान, या महिन्यात किंमती कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
लसणाचे भाव (Garlic Price) वाढण्याची कारणे?
गेल्या काही आठवड्यात लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. शेती उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लसूणाचे प्रति दहा किलो दर 1000 ते 3000 रूपयांच्या आसपास पहायला मिळत आहेत. सहाजिकच किरकोळ बाजारातील दर वाढलेले आहेत. खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे. खराब हवामानामुळे पिकाचे नुकसान झाले, त्यातच दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास झालेला उशीर यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब झाल्याने भाव वाढताना दिसत आहेत.
लसणाचे दर कमी होतील का?
मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. आता दर वाढल्याचे पहायला मिळत असले तरी, येत्या काही दिवसात नवीन लसूण बाजारात येताच, लसणाचे भाव उतरतील असा अंदाज आहे. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते खरीप लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.
भारतात 32 लाख टन लसूण उत्पादन
भारतात सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते. भारतात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. मात्र, चीनमध्ये उत्पादनात घट होऊनही ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते.
जागतिक बाजारात भारताच्या लसणाचे दर कमीच
भारतातील लसूण आकाराने चीनच्या लसूणपेक्षा लहान आहे. त्यामुळे भारतीय लसणाचे दरही कमी आहेत. जागतिक बाजारपेठेत चिनी लसणाची किंमत 1250 डॉलर प्रति टन आहे, तर भारतीय लसणाची किंमत 450 ते 1000 डॉलर प्रति टन आहे. त्यामुळे भारत गरीब ते श्रीमंत देशांच्या गरजेनुसार लसणाचा दर्जा देण्यास सक्षम आहे. चिनी लसणाची मागणी बहुतांशी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आहे, तर भारत मलेशिया, थायलंड, नेपाळ आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर लसूण निर्यात करतो.