‘युरिया गोल्ड’ला सरकारची परवानगी; गोणीचे वजन, किंमत आणि फायदे जाणून घ्या! Urea Gold Benefits
किसानवाणी | केंद्र सरकारने सध्याच्या युरियासह ‘युरिया गोल्ड’ (Urea Gold Benefits) हे खत लॉन्च करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सल्फर कोटेड युरियाची निर्मिती करण्यासह खत कंपन्यांना ही खते बाजारात आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे खत सल्फर कोटेड यूरिया नावाने बाजारात उपलब्ध होणार असून, याची गोणी 40 किलो वजनाची असणार आहे. या युरियाच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना पूर्वीचाच 266.50 रुपये प्रति गोणी (Urea Gold) हा दर लागू असणार आहे.
केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाने या निर्णयाची अधिसूचना जारी केली असून, ती सर्व खत (Urea Gold) उत्पादक कंपन्यांना पाठवण्यात आली आहे. 28 जून 2023 रोजी झालेल्या आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीने या सल्फर कोटेड यूरियाला ‘युरिया गोल्ड’ नावाने लॉन्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या युरियाची निर्मिती करण्यासह बाजारात उपलब्ध करण्यासाठी खत उत्पादक कंपन्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच हा सल्फर कोटेड युरिया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
युरीया आणि युरिया गोल्ड मध्ये फरक काय?
सल्फर कोटेड युरिया गोल्ड हे खत 40 किलोच्या गोणीमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर सध्याची नीम कोटेड युरियाची गोणी ही 45 किलो वजनाची असते. सध्याच्या नीम कोटेड युरियाच्या गोणीसाठी जीएसटीसह एकूण 266.50 रुपये खर्च येतो. मात्र दोन्ही युरियाच्या गोणीचे दर सारखेच असणार असून, त्यात 5 किलो वजनाचा फरक असणार आहे. दोन्ही गोणीचे दर समान ठेवल्याने शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही. याशिवाय शेतकरी अधिक पर्यावरणपूरक युरियाचा वापर करतील. असे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे.
युरिया गोल्ड मुळे पर्यावरणासह शेतकऱ्यांनाही फायदा
सल्फर कोटेड युरियामधून नायट्रोजन हळूहळू बाहेर पडतो. या युरियामध्ये ह्युमिक ऍसिड असल्यामुळे, तो जास्त टिकू शकतो. सध्या वापरात असलेल्या युरियाला हा एक चांगला पर्याय आहे. 15 किलो सल्फर कोटेड युरिया हा सध्याच्या 20 किलो युरिया इतका फायदा मिळवून देत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गोल्ड युरियाच्या वापरामुळे पर्यावरणासह शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असल्याचे सरकारी पातळीवरून सांगण्यात येत आहे.