हवामान

विदर्भासह राज्यात पावसाचा जोर वाढणार | IMD Weather 2023

किसानवाणी | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पोषक प्रणालींमुळे विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 13) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD Weather) वर्तविला आहे.

दक्षिणेकडे सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस जैसलमेर, शिवपूरी, रांची, दिघा ते पूर्व – मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. नैऋत्य उत्तर प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे बांगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो सक्रिय आहे. उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा.

मुंबईसह कोकणातही पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकते. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होवू शकते. त्यामुळेही पावसाची शक्यता वाढणार असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button