भारतीय अंड्याला जागतिक बाजारात मागणी वाढली; पण दर वाढतील का? जाणून घ्या.. | Eggs Market
किसानवाणी | नवीन वर्षाची सुरवात झाली आणि जानेवारी मध्येच अंडी दरात सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले. अंडी दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तुलनेनं अंडी उत्पादन वाढल्यानं दर पुन्हा नरमल्याचे चित्र पहायला मिळाले होते. आता मात्र टर्की देशाकडून अंडी निर्यात (Egg Export) घटल्याने त्याचा फायदा भारताला (Eggs Market) होणार असून अंडी निर्यातीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारात अंडी निर्यातीत टर्कीचा मोठा वाटा आहे. पण मागील महिन्यात टर्की मध्ये झालेल्या भुकंपाने मोठा विध्वंस झाला आहे. याचा फटका टर्कीतील पोल्ट्री उद्योगालाही बसला आहे. परिणामी टर्कीतील अंडी उत्पादन घटल्याने भारतातून अंडी निर्यात वाढली आहे.
पूर्व आशियातूनही भारतीय अंड्याला मागणी वाढली आहे. भारतातील महत्वाच्या अंडी उत्पादक नमक्कल भागातून निर्यात वाढली असून निर्यातीत किमान १० टक्के वाढ होण्याचा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत. देशातील एकूण अंडी निर्यातीपैकी नमक्कल भागातून तब्बल ९० ते ९५ टक्के निर्यात होत असते.
देशातून मागीलवर्षी १०० कोटी अंडी निर्यात झाली होती. फिफा विश्वचषकामुळे कतारने जवळपास १.५ कोटी अंडी आयात केली. तर मलेशियाला ५० लाख अंडी निर्यात झाली आहेत.
श्रीलंका आणि दुबईतूनही भारतीय अंड्याला मागणी येत आहे. भारतीय अंड्याचा मुख्य ग्राहक ओमान आहे. त्यानंतर मालदीव, युएई आणि कतारचा क्रमांक लागतो. भारतातून अंडी निर्यात वाढल्यास दर देखील वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे सध्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पोल्ट्री उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.