बातम्या

वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रुपांतर कसे करायचे? जाणून घ्या या प्रक्रियेविषयी सविस्तर.. Land Rule

वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रुपांतर कसे करायचे? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? नजराणा किती लागतो? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

वर्ग-1 आणि वर्ग-2 ची जमीन म्हणजे काय?

सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, ते नमूद केलेले असते.

भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.

भोगवटादार वर्ग-2 या पद्धतीतमध्ये खातेदारांना शासनाकडून मिळालेल्या जमिनी असतात. या जमिनींचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनींचे हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करणे) नियम, 2019 राजपत्राद्वारे प्रसिद्ध केला आहे. या नियमानुसार, ज्या जमिनी शासनाने नागरिकांना कृषिक, रहिवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत, त्या जमिनींचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येते. यासाठी तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे खालीलप्रमाणे अर्ज करावा लागतो.

वर्ग-2 मधून वर्ग-1 करताना नजराणा किती लागतो?

बदललेल्या नियमांनुसार, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग-2 मधून वर्ग-1 करताना कोणताही नजराणा आकारला जाणार नाही, पण इतर भूमिहीनांना सरकारने दिलेल्या जमिनी वर्ग-2 मधून वर्ग-1 करताना प्रचलित दरानुसार नजराणा आकारला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात याविषयी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “भोगवटादार वर्ग-2 मधून 1 करताना ज्या मूळ खंडकऱ्यांच्या जमिनी होत्या, त्यांना अधिमूल्य आकारायचे नाही. इनामाच्या ज्या जमिनी आहेत, त्यावर प्रचिलित कायद्यानुसार आकारणी करावी लागेल.”

प्रचलित दरानुसार, नजराणा किती भरावा लागेल ते पाहूया…

 • कृषिक प्रयोजनसाठी जमीन प्रदान केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
 • वाणिज्यिक अथवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
 • रहिवासी वापरासाठी कब्जेहक्काने धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 15% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
 • रहिवासी वापरासाठी पण भाडेपट्ट्याने धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 25% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 च्या या नियमानंतर, ज्या नागरिकांनी वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये रुपांतरित केल्यात त्यांना नजराणा भरण्यासाठी 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. आधी ही मुदत मार्च 2022 पर्यंत होती.

आवश्यक कागदपत्रे

वर्ग-2 च्या जमिनीचे 1 मध्ये रुपांतर करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागणार, ते जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन त्याबाबत विचारपूस करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे यातील महत्वाची कागदपत्रे कोणती ते पाहूया..

 • संबंधित जमिनीचे गेल्या 50 वर्षांतील सातबारा उतारे
 • या सातबारा उताऱ्यावरील सर्व फेरफार नोंदी
 • चतु:सीमा दाखवणारा नकाशा
 • आकरबंदाची मूळ प्रत
 • एकत्रीकरणाचा मूळ उतारा
 • मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत
 • तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा

अर्ज केल्यानंतर पुढे काय?

अर्ज सादर केल्यानंतर नजराणा किती भरायचा त्याबाबतचे चलन तहसील कार्यालयाकडून अर्जदारास दिले जाते. अर्जदाराने बँकेत ही रक्कम भरल्यास ते चलन आणि खरेदीची इतर कागदपत्रे पाहून तलाठी त्या व्यवहाराची गाव नमुना 6 मध्ये नोंद करतात. पुढे मंडळ अधिकारी सर्व कागदपत्रे तपासतात आणि मग त्या जमिनीवरील भोगवटादार वर्ग-2 हा शेरा कमी होऊन तिथे भोगवटादार वर्ग-1 हा शेरा लागतो. अशा प्रकारे वर्ग 2 च्या जमीनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर होते.

Back to top button