मुंबई | नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत जुलै, 2019 व राज्य शासनामार्फत मे 2021 मध्ये पीएम कुसुम योजना (PM KUSUM YOJANA) निर्गमित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्णत: ऑनलाईन आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे एसएमएस(SMS) प्राप्त झाल्यास त्यापासून लाभार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने (महाऊर्जा) शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
महाऊर्जाने ही योजना राबविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले असून या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जांची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरण्याची व पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, असे ही महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत कळविण्यात आले आहे.
पीएम कुसुम योजना काय आहे? PM KUSUM YOJANA
राज्य शासनाने या योजनेतंर्गत एक लाख चार हजार 823 सौर कृषिपंपाना मान्यता दिली असून महाऊर्जामार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महाऊर्जामार्फत आतापर्यंत साधारण 75 हजार 778 सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.
पीएम कुसुम योजनेतंर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित 3, 5 व 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप 90 ते 95 टक्के अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात येतात. या सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के व अनुसूचित जाती, अनुसूचति जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस (SMS) पाठविण्यात येतो. याअनुषंगाने प्राप्त झालेल्या खोट्या एसएमएस (SMS) पासून शेतकऱ्यांनी सावध रहावे, असे महाऊर्जा मार्फत कळविण्यात आले आहे.