देशातील साखर उत्पादनात वाढ! महाराष्ट्राची ऊस गाळपात देशपातळीवर आघाडी | Sugar Production January 2024
किसानवाणी | जानेवारी महिना अखेर देशपातळीवरील ५१७ कारखान्यांमधून एकूण १९२८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून सरासरी 9.71 टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनाचे नवीन साखर उत्पादन (Sugar Production January 2024) झाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश दांडेगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटक राज्यातील पाच आणि गुजरातमधील एक अशा एकूण सहा कारखान्यांनी गाळप हंगाम पूर्ण केला आहे. ऊस गाळपात देशपातळीवर आघाडी राखणाऱ्या महाराष्ट्राने ६७६ लाख टन गाळप केले असून त्यापैकी ६५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या गाळपाला सरासरी ९.६० टक्के उतारा मिळाला आहे. सध्यस्थितीनुसार महाराष्ट्रातील गाळप हंगाम मार्चच्या अखेर ते एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याची अपेक्षा आहे.
दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमध्ये ऊसाचे गाळप ५७४ लाख टन झाले असून १०.५ टक्के उताऱ्यासह ५७.६५ लाख टन नवीन साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम एप्रिल अखेर ते मेच्या मध्यापर्यंत चालण्याची अपेक्षा आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक राज्याने 377 लाख टन उसाच्या गाळपापासून सरासरी 9.75 टक्के उताऱ्यासह सुमारे 37 लाख टन नवीन साखरेचे उत्पादन केले. उर्वरित सर्व राज्यांतील ऊस गाळप, सरासरी साखर उतारा आणि साखरेचे नवीन उत्पादन लक्षात घेता, देशपातळीवर यंदाच्या हंगामाच्या अखेरीस नवीन साखरेचे ३१४ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. परतीचा पाऊस तसेच इथेनॉल उत्पादनाकडे वळवलेल्या साखरेवरील निर्बंधांमुळे नवीन साखर उत्पादनात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या ३३१ लाख टनांच्या तुलनेत हे अपेक्षित साखरेचे उत्पादन १७ लाख टन कमी असले, तरी देशाच्या साखर उत्पादनाचा ताळेबंद पाहता, वर्षअखेरीस ७५ ते ८० लाख टन साखरेचा साठा राहण्याची अपेक्षा आहे. ही बाब आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाच्या दृष्टीस आणली आहे. तसेच किमान १५ लाख टन अधिक ऊस इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यास परवानगी देण्याची विनंती देखील केली आहे. इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांमध्ये पडलेल्या बी हेवी मळीचा इथेनॉल निर्मीतीसाठी वापर करून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांवर तोडगा निघू शकतो असे श्री.दांडेगावकर यांनी म्हणटले आहे.