तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव; दरातील तेजी टिकून | Tur Market 1st May 2024
मुंबई | देशातील बहुतांशी बाजारात तुरीच्या भावातील तेजी टिकून आहे. तुरीचा भाव सरासरी ११ हजारांच्या पुढे आहे. यामध्ये जूनपर्यंत काही प्रमाणात चढ-उतार राहू शकतात. त्यानंतर मात्र सणासुदीच्यामुळे दराला आणखी आधार मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
सध्या तुरीची सरासरी भावपातळी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल भाव १२ हजारांच्या दरम्यान आहेत. सध्या बाजारातील तुरीची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. कर्नाटकातील तुरीची आवक मंदावली आहे. त्यामुळे डाळीच्या कारखान्यांना मालाचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आवकही कमी होत असल्याचे चित्र आहे.
सध्या तुरीचा कमी-अधिक प्रमाणात सरकारी नियमात राहून स्टॉक केला जात आहे. प्रक्रिया प्लांट्सचीही खरेदी गरजेप्रमाणे सुरू आहे. तुरीच्या डाळीला मागणी आहे. पण उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे. त्यामुळे तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे. असं असलं तरी, पुढच्या दीड ते दोन महिन्यांत तुरीच्या भावातील सुधारणा मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.
सध्या तुरीचा साठा असलेल्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश जण तुरीची विक्री जूनमध्ये करतील अशी शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात तुरीची आयात देखील सुरू आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिने दरातील वाढ मर्यादित राहू शकते. सध्याच्या भावात ५०० रुपयांपर्यंतचे चढ-उतार राहतील असा अंदाज आहे. त्यामुळे जे शेतकरी या काळात तुरीची विक्री करण्याचे नियोजन करत आहेत, त्यांनी १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान तूर विक्रीचा विचार करावा असे अभ्यासकांचे मत आहे.
यंदा पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीची लागवड वाढेल, असा अंदाज आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला आणि लागवड खरोखरच वाढली तर याचाही काहीसा परिणाम बाजारावर दिसू शकतो. म्हणजेच तुरीच्या भावातील सुधारणा काही काळ थांबू शकते, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
तूर विक्रीचा हा टप्पा संपल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे, असेही अभ्यासकांनी सांगितले. तुरीची आयात होणार असली तरी देशात तुरीची टंचाई आहे. यंदा उत्पादन ३० ते ३२ लाख टनांवरच स्थिरावल्याचे सांगितले जात आहे. तर देशाला ४६ लाख टनांच्या दरम्यान तूरीची गरज आहे. त्यामुळे आयात वाढवली तरी तुरीची टंचाई कायम राहणार आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ च्या वर्षात ७ लाख ७५ हजार टनांची आयात झाली. मागच्या हंगामात ८ लाख ९५ हजार टन आयात झाली होती. तर त्याधीच्या वर्षात ८ लाख ४० हजार टन तूर आयात झाली होती.
तूरीची आयात महाग
भारताला यंदा आयात तूरही महाग मिळत आहे. आयात तुरीचा सरासरी भाव ९ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळेच पुढील हंगामातील तूर हाती येईपर्यंत तुरीचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात तुरीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर दरात काहीसे चढ-उतारही दिसतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.