कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होत असून, मंगळवारी (दि. ९ जून) कोल्हापुरात शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा (Kolhapur Farmers Protest) काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन बाधित होणार असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला.
दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आणि महिला शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत महामार्ग प्रकल्पाविरोधात संताप व्यक्त केला. ‘रक्ताचे पाट वाहतील, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही’, असा आक्रमक इशारा देत शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
या मोर्चात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाल्याने आंदोलनाला मोठे राजकीय वजन प्राप्त झाले.
मोर्चादरम्यान अनेक महिला शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “मोबदला पिशवीत भरायचा काय? शेतीच पाहिजे. पैसे नकोत. मुलांना नोकऱ्या नाहीत, मग खायचं काय?” असा संतप्त सवाल एका महिला शेतकऱ्याने उपस्थित केला. “आम्हाला मोबदला नको, आमची जमीन आम्ही देणार नाही. आमचं शेत, आमचा भात आणि आमचं उत्पन्न सगळंच जाणार असेल तर आम्ही जगायचं कसं?” अशा प्रतिक्रिया देखील आंदोलनस्थळी ऐकायला मिळाल्या.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी राज्य शासनावर टीका करत मोर्चा रोखण्यासाठी दडपशाही केल्याचा आरोप केला. “गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. हा मोर्चा निघू नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकरी मोर्चात सहभागी असताना त्यांच्या जमिनींची मोजणी सुरू करण्यात आली. शेतकरी उपस्थित असताना मोजणी करण्याची हिंमत दाखवा, मग शेतकरी त्याला कशा प्रकारे उत्तर देतात ते दिसेल,” असा इशारा त्यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही या प्रकल्पावर टीका करत केवळ ५० हजार कोटी रुपयांच्या लाभासाठी हा रस्ता लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी केली.
दरम्यान, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ७३ गावांमधून जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर बागायती आणि उत्पादनक्षम जमीन संपादित होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली असून, येत्या काळात आंदोलन आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
