किसानवाणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MahaBeej Recruitment 2026) मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाबीजच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला मोठी चालना मिळणार असून कृषी क्षेत्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांची तब्बल १९० पदे मंजूर करण्यात आली असून येत्या काळात ही पदे भरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाबीजच्या विविध विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकऱ्यांपर्यंत बियाण्यांचे वितरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नुकताच शासन निर्णय जारी करत महाबीजच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे.
शासनाच्या मंजुरीनुसार महाबीजसाठी एकूण ७२३ पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ५६० नियमित पदे, १०० अधिसंख्य पदे आणि ६३ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
| पदांचा प्रकार | मंजूर पदे |
|---|---|
| नियमित पदे | ५६० |
| अधिसंख्य पदे | १०० |
| बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणारी पदे | ६३ |
| एकूण पदे | ७२३ |
यापूर्वी ३० ऑक्टोबर २०१४ रोजी मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधामध्ये एकूण ७३७ पदे होती. मात्र, बदलत्या तांत्रिक गरजा, आधुनिक कार्यपद्धती आणि संस्थेच्या सध्याच्या आवश्यकता लक्षात घेऊन नव्या आकृतीबंधात पदरचनेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. अधिसंख्य पदे रिक्त झाल्यानंतर ती पुन्हा भरण्यात येणार नसून भविष्यात नियमित पदांची संख्या ५६० इतकीच कायम राहणार आहे.
नव्या आकृतीबंधातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी सहायकांची १९० पदे. संशोधन, विस्तार सेवा आणि शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी ही पदे महत्त्वाची मानली जातात. शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रियेद्वारे ही पदे भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांसाठी ही मोठी रोजगाराची संधी ठरू शकते.
याशिवाय वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई, पहारेकरी आणि लघुलेखक निम्न श्रेणी यांसारखी काही पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाबीजची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक मजबूत होईल. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करणे अधिक सुलभ होणार आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, बदलत्या तांत्रिक गरजा आणि वाढत्या कार्यव्याप्तीचा विचार करून सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाबीजची कार्यक्षमता वाढेल, बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम बनेल आणि त्याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल.
