महाराष्ट्रात मॉन्सूनची सर्वदूर हजेरी; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, कोकणात अतिवृष्टी | Maharashtra Rain Forecast

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Maharashtra Rain Forecast) अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागाने आज (२५ जून) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून संबंधित भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणासह उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच उत्तर बंगालचा उपसागर, बांगलादेश, आग्नेय मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात विविध हवामान प्रणाली कार्यरत असल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदा केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे महाराष्ट्रातील प्रगतीलाही विलंब झाला होता. ६ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनने ८ जूनपर्यंत रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर जवळपास दोन आठवडे त्याची वाटचाल मंदावली होती. मात्र २२ जूनपासून पुन्हा वेग घेत मॉन्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग व्यापत २४ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आपल्या अधिपत्याखाली घेतला.

आज पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बीड आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी १६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. मॉन्सूनच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील तापमानाचा पारा सर्वत्र चाळिशीखाली आला आहे.

राज्यातील प्रमुख तापमान नोंदी : Maharashtra Rain Forecast

ठिकाणकमाल तापमान (°C)किमान तापमान (°C)
अकोला38.924.3
अमरावती38.020.9
पुणे30.721.6
नाशिक31.723.0
कोल्हापूर26.421.2
महाबळेश्वर19.416.4
छत्रपती संभाजीनगर35.623.0

दरम्यान, कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातील मांडवी, निर्मळ आणि माणिकपूर येथे प्रत्येकी २९७ मिमी पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातील कोपरोली येथेही २९७ मिमी पाऊस झाला. उरणमध्ये २४३ मिमी, पोयनाड व कासू येथे प्रत्येकी २७८ मिमी, तर रामराज येथे २३२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे काही भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि सखल भागांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत.

२०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडलेली प्रमुख ठिकाणे : Maharashtra Rain Forecast

ठिकाणपाऊस (मिमी)
मांडवी (पालघर)297
निर्मळ (पालघर)297
माणिकपूर (पालघर)297
कोपरोली (रायगड)297
वसई283
पोयनाड278
कासू278
भाईंदर267
उरण243
आगाशी / विरार233
रामराज232
मांदाड223
महाबळेश्वर215

मध्य महाराष्ट्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा, कुसगाव, नारायणगाव आणि जुन्नर परिसरात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे २१५ मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरात ६५ ते ११० मिमी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळाली आहे. तरीही अनेक भागांत समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

विदर्भात अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये ६५ ते १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नांगरणी, वखरणी आणि पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी तयारी करत असून भात उत्पादक भागांत चिखलणीची कामे सुरू झाली आहेत.

एकूणच, संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. कोकण आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना, राज्यातील इतर भागांनाही आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा