किसानवाणी : राज्यात मान्सूनचा प्रभाव पुन्हा वाढू लागला असून अनेक भागांत पावसाने हजेरी (Maharashtra Weather IMD Weather Forecast) लावण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असताना, कोकणात मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्याचा सविस्तर हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार आज कोकणातील पालघर जिल्ह्यासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. भंडारा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज : Maharashtra Weather IMD Weather Forecast
| दिवस | संभाव्य पावसाचा अंदाज |
|---|---|
| मंगळवार | कोकणासह धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाची शक्यता. |
| बुधवार | संपूर्ण कोकणासह अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज. |
| गुरुवार | संपूर्ण कोकणासह पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाची शक्यता. |
| शुक्रवार | कोकणासह अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज. तसेच पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही पावसाचा इशारा. |
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तसेच समुद्रकिनारी राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतही पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतीच्या दृष्टीनेही हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
