Soybean Yellow Mosaic Virus | सोयाबीन पीक पिवळं पडतंय? आधी कारण ओळखा, मगच करा उपाय

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : सोयाबीन पिकात पिवळेपणा (Soybean Yellow Mosaic Virus) दिसू लागला की अनेक शेतकरी तातडीने खतांची किंवा औषधांची फवारणी करण्याचा निर्णय घेतात. मात्र, पिके पिवळी पडण्यामागे नेहमीच एकच कारण असते असे नाही. अन्नद्रव्यांची कमतरता, सततचा पाऊस, विषाणूजन्य रोग, रसशोषक किडी किंवा तणनाशकांचा चुकीचा वापर अशा अनेक कारणांमुळे सोयाबीनमध्ये पिवळेपणा दिसू शकतो. त्यामुळे कोणतेही औषध किंवा खत वापरण्यापूर्वी पिवळेपणाचे नेमके कारण ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य निदान करून उपाययोजना केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो आणि उत्पादनातील संभाव्य नुकसानही कमी करता येते, असा सल्ला प्रादेशिक संशोधन केंद्राच्या अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन प्रकल्पातील तज्ज्ञ प्रा. राजीव घावडे, प्रा. मंगेश दांडगे आणि डॉ. प्रवीण पाटील यांनी दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोयाबीन पिकात पिवळेपणा दिसल्यानंतर सर्वप्रथम शेताची बारकाईने पाहणी करणे आवश्यक आहे. संपूर्ण शेत पिवळे पडले आहे की फक्त काही भाग प्रभावित झाला आहे, शेतात पाणी साचले आहे का, जुनी पाने पिवळी होत आहेत की नवीन पाने, तसेच पानांच्या रंगात नेमका कोणता बदल दिसत आहे याचे निरीक्षण करावे. या प्राथमिक निरीक्षणावरून पिवळेपणामागील कारणाचा अंदाज येऊ शकतो आणि त्यानुसार योग्य उपाय करता येतो.

सतत पावसामुळे पाणी साचल्यास काय करावे?

सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यास सोयाबीनच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे झाडांची वाढ मंदावते आणि पाने पिवळी पडू लागतात. अशा परिस्थितीत सर्वप्रथम शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवस उघडीप मिळाल्यावरच विद्राव्य खतांची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार अशावेळी प्रति लिटर पाण्यात २० ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास पिकाला फायदा होऊ शकतो.

अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे : Soybean Yellow Mosaic Virus

सोयाबीनमध्ये विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेही पिवळेपणा दिसून येतो. प्रत्येक अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे वेगवेगळी असतात.

अन्नद्रव्यप्रमुख लक्षणेशिफारस
बोरॉनपाने सुरकुतणे, कडा वाळणेकमतरतेनुसार खतांचा वापर
गंधककोवळी पाने व शिरा पिवळसर होणेअमोनियम सल्फेट वापर
लोहशिरा हिरव्या राहतात, मधला भाग पिवळा पडतोफेरस सल्फेट वापर
स्फुरदपानांवर जांभळट छटास्फुरदयुक्त खतांचा वापर
पालाशजुनी पाने पिवळी पडणेपालाशयुक्त खतांचा वापर

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५५३ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ | Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

महाडीबीटीवर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया | Cotton Shredder

अशा परिस्थितीत कमतरतेनुसार झिंक सल्फेट ५ किलो, फेरस सल्फेट ५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ पाच किलो किंवा अमोनियम सल्फेट १५ ते २० किलो यापैकी कोणतेही एक खत २० किलो १०:२६:२६ सोबत मिसळून जमिनीत द्यावे. मात्र, ही खते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.

पिवळा मोझॅक रोगही ठरू शकतो मोठे कारण

सोयाबीनमध्ये पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग पिवळेपणाचे एक प्रमुख कारण मानला जातो. हा रोग प्रामुख्याने पांढरी माशी आणि तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींमुळे पसरतो. साधारणपणे पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी या रोगाची लक्षणे दिसू लागतात. रोगाची लागण सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास उत्पादनात तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीनंतर २० ते ३५ दिवसांच्या दरम्यान ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. नत्राचा संतुलित वापर करावा तसेच हेक्टरी २२ ते २३ पिवळे चिकट सापळे लावावेत. रोगग्रस्त रोपे दिसताच ती उपटून शेताबाहेर नष्ट करावीत.

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बीटा-सायफ्लूथ्रिन (८.४९ टक्के) + इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के) ०.७ मिली प्रति लिटर पाणी किंवा थायोमेथोक्झाम + लँबडा सायलोथ्रीन ०.२५ मिली प्रति लिटर किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (९.३० टक्के) + लँबडा सायलोथ्रीन (४.६० टक्के) ०.४ मिली प्रति लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तणनाशकांचा चुकीचा वापरही ठरतो धोकादायक

अयोग्य तणनाशकांची निवड, शिफारशीपेक्षा जास्त मात्रा, पाण्याचे चुकीचे प्रमाण किंवा तणनाशकासोबत खत अथवा कीटकनाशके मिसळून फवारणी केल्यास सोयाबीन पिकावर स्कॉर्चिंग येऊ शकते. त्यामुळे पानांचा रंग बदलतो, वाढ खुंटते आणि झाडांवर ताण निर्माण होतो.

अशा परिस्थितीत पिकाला कोळपणी करून डीएपी आणि युरिया द्यावा किंवा २०:२०:००:१३ सोबत झिंक सल्फेट वापरावे. फवारणी करायची असल्यास १९:१९:१९ हे विद्राव्य खत (१०० ग्रॅम) अमिनो अॅसिड किंवा सायटोकॅनिन (२५ ते ३० मिली प्रति पंप) यांसोबत वापरता येते.

तज्ज्ञांच्या मते, तणनाशकांची फवारणी करताना शिफारशीनुसारच औषधे वापरणे आवश्यक आहे. तणनाशकांमध्ये खत, टॉनिक किंवा कीटकनाशके विनाकारण मिसळू नयेत. सोयाबीनमधील पिवळेपणाचे नेमके कारण ओळखून त्यानुसार उपाययोजना केल्यास उत्पादनातील नुकसान आणि अनावश्यक खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा