शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५५३ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ | Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची (Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme) प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवार (२२ जुलै) पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील ५५३ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे कामही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य सरकारने यापूर्वी राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही अधिक दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ५० हजार रुपयांच्या लाभाऐवजी आता २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे १२ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी ४ हजार ३९५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे राज्यातील कर्जमुक्ती योजनेवरील एकूण आर्थिक भार ४० हजार ९८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या रकमेमध्ये पुनर्गठित कर्जे तसेच एकवेळ समझोता योजनेतील कर्जांचाही समावेश असल्याचे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यातील लाभार्थी : Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांचा आयकराच्या निकषांमध्ये समावेश होत नाही, अशा पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा बँकलाभार्थी शेतकरी
अमरावती५८
लातूर१३३
नागपूर१६
पुणे८५
सातारा३८
ठाणे१८२
एकूण५५३

हेही वाचा : ई-ठिबक पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; ठिबक वितरकांचे प्रस्ताव रद्द करू नका, कृषी विभागाच्या सूचना | Maharashtra E-Drip Portal

द्राक्ष बागायतदार सावधान! केवडा रोग कार्यरत होण्याची शक्यता; जैविक नियंत्रणावर तज्ज्ञांचा भर | Grape Farming Downy Mildew Biological Disease Control

या ५५३ शेतकऱ्यांचे एकूण २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपये कर्जमाफ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये केवळ अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ५८ शेतकऱ्यांचे ३८ लाख ३७ हजार ११९ रुपये कर्जमाफ करण्यात येणार आहे.

कर्जमाफीसाठी मोठी आर्थिक तरतूद

राज्य सरकारने या कर्जमुक्ती योजनेसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. या निधीतून राज्यातील जवळपास ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अतिरिक्त १२ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यासाठी ४ हजार ३९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठीची एकूण रक्कम ४० हजार ९८० कोटी रुपये झाली असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार

सरकारकडून उर्वरित पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेला फार वेळ लागणार नसल्याचे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, केंद्र सरकारकडून आयकर विभागाची संपूर्ण माहिती अद्याप राज्य शासनाला प्राप्त झालेली नसल्यामुळे अंतिम यादी तयार करण्यासाठी आवश्यक पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पारदर्शक आणि नियोजनबद्ध प्रक्रिया

कर्जमुक्ती योजनेची लाभार्थी निवड आणि निधी वितरण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा दावा सरकारने केला आहे. या योजनेचा उद्देश केवळ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे नसून, त्यांचा आर्थिक ताण कमी करून त्यांना पुन्हा सक्षमपणे शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, यापूर्वीच्या अनेक कर्जमाफी योजनांमध्ये कर्जमाफी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, यावेळी ज्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होईल, त्या शेतकऱ्याला त्याच्या पात्रतेनुसार नव्याने कर्ज उपलब्ध करून देणे सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळण्यास अडथळा येणार नाही.

राज्यात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीची अंमलबजावणी कधीही झाली नसल्याचा दावा करत सहकारमंत्र्यांनी सांगितले की, सहा वर्षांच्या आयकर नोंदींची पडताळणी करूनच लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यावर सरकारचा भर असून, उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा