किसानवाणी : देशभरात खरीप हंगामातील शेतीची कामे वेगाने सुरू झाली असून शेतकरी पेरणी, मशागतीसह विविध कृषी कामांमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan 23rd Installment) योजनेच्या २३ व्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. केंद्र सरकारकडून अद्याप २३ वा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्च २०२६ रोजी पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता वितरित केला होता. त्या वितरणाला जवळपास तीन महिने पूर्ण होत आले असून आता पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याआधी या योजनेचा १७ वा हप्ता १८ जून २०२४ रोजी वितरित करण्यात आला होता. हा पूर्वीचा वितरणाचा पॅटर्न लक्षात घेता, यंदाचा २३ वा हप्ता १८ जून २०२६ च्या आसपास जारी केला जाऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडूनच केली जाणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा लाभ देशभरातील लाखो लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळत असून शेतीसाठी आवश्यक असलेल्या खर्चात ही रक्कम काही प्रमाणात मदत करते.
पीएम किसान योजनेतील महत्त्वाची माहिती : PM Kisan 23rd Installment
| बाब | माहिती |
|---|---|
| योजना | पीएम किसान सन्मान निधी योजना |
| वार्षिक लाभ | ६,००० रुपये |
| हप्त्यांची संख्या | ३ |
| प्रत्येक हप्ता | २,००० रुपये |
| मागील हप्ता (२२ वा) | १३ मार्च २०२६ |
| संभाव्य २३ वा हप्ता | जूनअखेर किंवा जुलै २०२६ |
दरम्यान, केंद्र सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना पुढील हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा काही प्रकरणांमध्ये हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी पीएम किसान मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ओटीपी आधारित ई-केवायसी तसेच फेस ऑथेंटिकेशनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यामुळे लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत राहते आणि निधी वितरणात अडचणी निर्माण होत नाहीत.
e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी?
- पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्य पानावरील ‘e-KYC’ पर्याय निवडावा.
- त्याठिकाणी आधार क्रमांक नमूद करावा.
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी भरावा.
- ओटीपी पडताळणीनंतर e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
याशिवाय लाभार्थी शेतकरी आपल्या हप्त्याची स्थिती आणि अर्जाची माहिती देखील ऑनलाइन तपासू शकतात. त्यासाठी पीएम किसानच्या संकेतस्थळावरील ‘Farmer Corner’ विभागात जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा. मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर लाभार्थ्याला पेमेंटची स्थिती, अर्जाची माहिती आणि इतर तपशील पाहता येतात.
सरकारकडून २३ व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी जूनअखेरीस किंवा जुलै महिन्यात निधी वितरित होण्याची शक्यता असल्याने लाभार्थी शेतकरी ई-केवायसी आणि इतर आवश्यक पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ठेवणे आवश्यक आहे.
