हस्त बहराचे नियोजन करून कागदी लिंबातून मिळवा अनेकपटीने अधिक नफा; जाणून ‘घ्या’ संपूर्ण व्यवस्थापन |lemon farming

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र बाजारपेठेतील मागणी आणि उपलब्धता यांचा विचार करता उन्हाळ्यात मिळणाऱ्या लिंबांना (lemon farming) सर्वाधिक दर मिळतो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात फळांची उपलब्धता होण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हस्त बहरामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुलधारणा होते आणि त्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत फळे काढणीस तयार होतात. या काळातील लिंबांना बाजारात मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो.

साधारणपणे १५ किलो कागदी लिंबाच्या एका कट्ट्याला आंबिया बहरातील फळांसाठी १५० ते २०० रुपये, मृग बहरातील फळांसाठी सुमारे ३०० रुपये तर हस्त बहरातील फळांसाठी तब्बल १,२०० ते १,५०० रुपये दर मिळतो. यावरून हस्त बहरातील फळांना आंबिया बहराच्या तुलनेत ६ ते ७ पट आणि मृग बहराच्या तुलनेत ३ ते ५ पट अधिक दर मिळत असल्याचे स्पष्ट होते.

बहर प्रकारअंदाजे दर (१५ किलो कट्टा)
आंबिया बहर₹१५० ते ₹२००
मृग बहर₹३००
हस्त बहर₹१,२०० ते ₹१,५००

लिंबामध्ये नैसर्गिकरीत्या आंबिया बहर ६० टक्के, मृग बहर ३० टक्के आणि हस्त बहर केवळ १० टक्के प्रमाणात येतो. हस्त बहर वाढवण्यासाठी आवश्यक असलेला पाण्याचा ताण ऑगस्ट-सप्टेंबर या पावसाळी कालावधीत देणे कठीण जाते. त्यामुळे नियोजनबद्ध व्यवस्थापन आवश्यक ठरते.

हस्त बहर घेण्यासाठी सर्वप्रथम झाडावर मृग बहराची फळे नसणे आवश्यक आहे. यासाठी झाडाला मृग बहर कमी येण्याची सवय लावणे गरजेचे आहे. त्यामुळे मृग बहरातील फळधारणा कमी होते आणि पुढील काळात हस्त बहर नियमितपणे येण्यास मदत होते.

मृग बहरातील फुलधारणा रोखण्यासाठी जिबरेलिक आम्लाचा वापर उपयुक्त ठरतो. जून-जुलै महिन्यांत जिबरेलिक ॲसिड ५० पीपीएम या प्रमाणात म्हणजे ५ ग्रॅम जिबरेलिक आम्ल १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी फुलधारणा सुरू होण्याच्या १५ ते २० दिवस आधी ही फवारणी करणे आवश्यक आहे. या फवारणीमुळे मृग बहरातील फुलधारणेऐवजी शाखीय वाढ होते आणि फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजे हस्त बहराच्या काळात होण्यास मदत मिळते.

झाडामध्ये अन्नसंचय वाढवण्यासाठी आणि विश्रांती मिळण्यासाठी १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पाण्याचा ताण देणे फायदेशीर ठरते. या ताणामुळे झाड सुप्तावस्थेत जाते आणि त्यामध्ये कर्ब-नत्र संचय वाढतो. मात्र ताणाच्या कालावधीत पाऊस झाल्यास योग्य ताण मिळत नाही. अशा परिस्थितीत सायकोसील १००० पीपीएम म्हणजे क्लोरमेक्वाट क्लोराइड १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यक असल्यास १५ दिवसांनी पुन्हा फवारणी करता येते. हे वाढनियंत्रक झाडातील जिबरेलीन व इतर संजीवकांच्या विरोधात कार्य करून झाडाची वाढ मंदावते आणि सुप्तावस्था निर्माण करते.

झाडांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. सहा वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना जुलै महिन्यात ३० ते ४० किलो शेणखत द्यावे. त्यासोबत ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम, ॲझोस्पिरिलिअम १०० ग्रॅम, पीएसबी १०० ग्रॅम आणि व्हॅम (मायकोरायझा) ५०० ग्रॅम वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे रासायनिक खतांची मात्रा २५ टक्क्यांपर्यंत कमी करता येते तसेच जमिनीचा पोत सुधारतो.

ऑक्टोबरमध्ये ताण सोडताना पोटॅशिअम नायट्रेट १ टक्का द्रावणाची फवारणी करावी. तसेच प्रति झाड ३०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. यासाठी ६५२ ग्रॅम युरिया, १८७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे. नत्र खताची अर्धी मात्रा सुरुवातीला आणि उर्वरित अर्धी मात्रा एका महिन्यानंतर किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यानंतर द्यावी.

फुलधारणेच्या काळात झिंक आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली असल्यास फुलधारणा सुधारते आणि फुलगळ कमी होते. यासाठी ताण तोडताना झिंक व बोरॉनयुक्त सर्वसमावेशक चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांची २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच जमिनीद्वारे झिंक सल्फेट २५० ग्रॅम, मॅग्नेशिअम सल्फेट २०० ग्रॅम, फेरस सल्फेट २०० ग्रॅम आणि बोरॉन १०० ग्रॅम प्रति झाड देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

योग्य पद्धतीने हस्त बहराचे नियोजन केल्यास उन्हाळ्यातील उच्च बाजारभावाचा लाभ घेऊन कागदी लिंब उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवू शकतात.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा