Farm Loan Waiver | 1.05 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ई-केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ (Farm Loan Waiver) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील 1,276 गावांमधील एकूण 1 लाख 5 हजार 128 शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 769 शेतकऱ्यांनी ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) प्रक्रिया पूर्ण केली असून उर्वरित 90 हजार 359 शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शासनाने पात्र शेतकऱ्यांची यादी गावागावांत प्रसिद्ध केल्यानंतर विविध ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आपल्या नावाचा समावेश यादीत झाला आहे का, याची खात्री करण्यासाठी शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या शाखा, ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतर संबंधित कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.

या योजनेअंतर्गत सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,276 गावांमधील 1 लाख 90 हजार 701 शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यानंतर पडताळणी प्रक्रियेनंतर आतापर्यंत 1 लाख 5 हजार 128 शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या संबंधित कर्ज खात्यात शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

योजनेतील सद्यस्थिती : Farm Loan Waiver

बाबसंख्या
जिल्ह्यातील गावांची संख्या1,276
पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले शेतकरी1,90,701
पात्र ठरलेले शेतकरी1,05,128
ई-केवायसी पूर्ण केलेले शेतकरी14,769
ई-केवायसी बाकी असलेले शेतकरी90,359

हेही वाचा : कर्जमाफीच्या १७ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? जिल्हानिहाय यादी पाहा | Farm Loan Waiver List

कर्जमाफीच्या १७ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? जिल्हानिहाय यादी पाहा | Farm Loan Waiver List

जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास पात्र असूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.

दरम्यान, सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र तसेच सीएससी (Common Service Centre) केंद्रांनी पात्र शेतकऱ्यांकडून ई-केवायसीसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनीही जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना विनाकारण पैसे देऊ नयेत आणि कोणाकडून शुल्काची मागणी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असेही अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.

पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून ती संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या नावाची खात्री या ठिकाणी सहज करू शकतात.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची यादीत खात्री करून अंगठ्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यावेळी मूळ आधार कार्ड आणि बचत बँक खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

प्रशासनाने यासोबतच आधार संलग्नीकरण, आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अटी असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या पात्रता पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आगामी काळात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहितीही जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा