जांभळाची नासाडी थांबवा! ‘या’ यंत्रातून तासाला 80 किलो गर, बियांमधूनही कमाई | Jamun Processing Pulp Machine

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ (Jamun Processing Pulp Machine) पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ आता व्यावसायिक शेतीतही आपले स्थान निर्माण करत आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडांमध्ये जांभळाची गणना केली जाते. गडद जांभळ्या-काळ्या रंगाची, आंबट-गोड आणि किंचित तुरट चव असलेली ही फळे पौष्टिकतेबरोबरच आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ आणि विविध अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे फळ, बिया, पाने आणि साल यांचा औषधनिर्मितीत वापर केला जातो. जांभळाच्या बियांमध्ये आढळणारे जॅम्बोलीनसारखे जैवसक्रिय घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

आता व्यावसायिक शेतीतही आपले स्थान निर्माण करत आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडांमध्ये जांभळाची गणना केली जाते. गडद जांभळ्या-काळ्या रंगाची, आंबट-गोड आणि किंचित तुरट चव असलेली ही फळे पौष्टिकतेबरोबरच आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ आणि विविध अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे फळ, बिया, पाने आणि साल यांचा औषधनिर्मितीत वापर केला जातो. जांभळाच्या बियांमध्ये आढळणारे जॅम्बोलीनसारखे जैवसक्रिय घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

जांभळाचा हंगाम प्रामुख्याने जून आणि जुलै महिन्यांमध्ये असतो. या काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभूळ उपलब्ध होत असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. तसेच वर्षभर जांभूळ उपलब्ध करून देण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची गरज वाढत आहे. जांभळापासून सरबत, जॅम, जेली, स्क्वॅश, व्हिनेगार, वाइन आणि आइस्क्रीम यांसारखी उत्पादने तयार केली जातात. मात्र त्यासाठी प्रथम फळांमधील गर आणि बिया वेगळ्या कराव्या लागतात.

जांभळाची साठवण क्षमता केवळ २ ते ३ दिवसांची असल्याने काढणीनंतर त्वरित प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. वाहतूक, उशिरा काढणी किंवा अति पिकलेली फळे यांमुळे २० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. याउलट, जांभळाचा गर काढून तो गोठवून साठविल्यास ६ ते १२ महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येतो. बिगरहंगामी काळात या गराची विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होते.

पारंपरिक पद्धतीमध्ये जांभळाचा गर आणि बिया वेगळे करण्याचे काम हाताने केले जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे खर्च वाढतो आणि उत्पादनाच्या स्वच्छतेवरही परिणाम होण्याची शक्यता असते. या समस्यांवर उपाय म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जांभूळ गर व बीज निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे गर आणि बिया जलद, स्वच्छ आणि कार्यक्षम पद्धतीने वेगळ्या करता येतात. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता सुधारते तसेच प्रक्रिया खर्चात बचत होते.

हे यंत्र एका मजुराच्या सहाय्याने सहज चालवता येते. यासाठी ०.५ अश्वशक्तीची सिंगल फेज विद्युत मोटर वापरण्यात आली आहे. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जांभूळ स्वच्छ पाण्याने धुऊन यंत्रात टाकले जाते. त्यानंतर विशेष रोलर यंत्रणेद्वारे गर आणि बिया वेगळ्या केल्या जातात. यंत्रातून मिळालेला गर त्वरित प्लास्टिक पिशवीत भरून उणे २० अंश सेल्सिअस तापमानाच्या डीप फ्रीजमध्ये साठवून ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. अशा प्रकारे साठविलेल्या गराचा रंग बदलत नाही आणि तो बिगरहंगामात विक्रीसाठी वापरता येतो.

या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना केवळ गरच मिळत नाही, तर बियांचाही अतिरिक्त फायदा मिळू शकतो. या बिया इच्छुक शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विकता येतात किंवा औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना औषधी घटक म्हणून पुरवठा करता येतो. त्यामुळे जांभूळ प्रक्रिया उद्योगातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होण्यास मदत होते. विद्यापीठामार्फत या यंत्रासह विविध कृषी प्रक्रिया यंत्रांच्या वापराबाबत प्रशिक्षण वर्गांचेही आयोजन केले जाते, ज्याचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.

यंत्राची प्रमुख वैशिष्ट्ये

घटकमाहिती
क्षमता७५ ते ८० किलो प्रति तास
मोटर०.५ अश्वशक्ती, सिंगल फेज
संचालनसुलभ व सोपे
मनुष्यबळअकुशल व्यक्तीदेखील चालवू शकते
गर निष्कासन कार्यक्षमता९५ ते ९७ टक्के
गरातील पाकळ्यांचे प्रमाणसुमारे ७५ टक्के

जांभूळ उत्पादनातून अधिक नफा मिळवण्यासाठी आणि फळांचे नुकसान कमी करण्यासाठी हे जांभूळ गर व बीज निष्कासन यंत्र शेतकरी, उद्योजक आणि प्रक्रिया उद्योगांसाठी उपयुक्त ठरत आहे. मूल्यवर्धनाद्वारे जांभळाला वर्षभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे यंत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा