हळदीचे 10 सर्वोत्तम वाण; कोणता देईल सर्वाधिक उत्पादन आणि जास्त कुरकुमीन? | Turmeric Varieties

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये हळद (Turmeric Varieties) हे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून घेतले जाते. बाजारपेठेतील मागणी, कुरकुमीनचे प्रमाण, वाळलेल्या हळदीचा उतारा, उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारक गुणधर्म या बाबी लक्षात घेऊन शेतकरी योग्य वाणाची निवड करतात. महाराष्ट्रात पारंपरिक वाणांबरोबरच कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले अनेक सुधारित वाणही उपलब्ध आहेत. प्रत्येक वाणाची उत्पादन क्षमता, पक्व होण्याचा कालावधी, हळकुंडांचा आकार, रंग आणि रोग सहनशीलता वेगवेगळी असल्याने लागवडीपूर्वी वाणांची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक ठरते.

महाराष्ट्रातील जवळपास ८० टक्के क्षेत्रावर लागवडीखाली असलेला सेलम हा वाण सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो. या वाणाला १५ ते १८ रुंद हिरवी पाने येतात आणि झाडाची उंची ५ ते ६ फूटांपर्यंत वाढते. एका झाडाला ३ ते ४ फुटवे येतात. हळकुंडे आणि उपहळकुंडे जाड, ठसठशीत असून गाभ्याचा रंग गर्द पिवळा आणि साल पातळ असते. या वाणात कुरकुमीनचे प्रमाण ३.५० ते ४.७५ टक्के असते. अनुकूल हवामानात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फुलेही येऊ शकतात. हा वाण ९ महिन्यांत तयार होतो. कच्च्या हळदीचे ३५० ते ४०० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते, तर वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७० ते ८० क्विंटल मिळते. वाळलेल्या हळदीचा उतारा सुमारे २० टक्के असून हा वाण करपा रोगास बळी पडतो.

राजापुरी हा वाण सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. या वाणाला १० ते १५ फिकट हिरवी, रुंद आणि सपाट पाने येतात. हळकुंडे जाड, ठसठशीत असून गाभा पिवळ्या रंगाचा असतो. हा वाण ८ महिन्यांत पक्व होतो. कच्च्या हळदीचे २४० ते २५० क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचे ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. उतारा १८ ते २० टक्के मिळतो. मात्र हा वाणही करपा रोगास संवेदनशील आहे. सांगली परिसरात उत्पादित होणाऱ्या या हळदीला ‘सांगली हळद’ म्हणून भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.

विदर्भासाठी विशेष शिफारस करण्यात आलेला पीडीकेव्ही वायगाव हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी विकसित केला आहे. हा मध्यम कालावधीचा वाण २१० ते २३० दिवसांत तयार होतो. प्रति हेक्टरी सुमारे ३०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते. या वाणात कुरकुमीनचे प्रमाण तब्बल ६.३० टक्के तर ओलीओरेसीनचे प्रमाण ११.७० टक्के आहे. हळद पावडर आकर्षक पिवळ्या रंगाची आणि सुगंधी मिळते. पानावरील ठिपके रोगास हा वाण प्रतिकारक असून ‘वायगाव हळद’ला भौगोलिक मानांकनही प्राप्त झाले आहे.

फुले स्वरूपा (DTS-222) हा वाण हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रस येथे ‘दुग्गिराला रेड’ वाणातून विकसित करण्यात आला आहे. हा वाण ८.५ महिन्यांत पक्व होतो. झाडाला २ ते ४ फुटवे येतात. हळकुंडे आणि गड्डे मध्यम आकाराचे असून इतर वाणांच्या तुलनेत १५ ते २० टक्के बेण्याची बचत होते. प्रति हेक्टरी ३६० क्विंटल ओल्या हळदीचे आणि ७९ क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन मिळते. उतारा २२ टक्के असून कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के आहे. हा वाण करपा रोग आणि कंदमाशीला सहनशील आहे.

फुले हरिद्रा हा वाण ‘सेलम’ वाणातून म्युटेशन पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. हा मध्यम कालावधीचा वाण सुमारे २५५ दिवसांत तयार होतो. प्रति हेक्टरी ४० ते ४०.६ मेट्रिक टन ओल्या हळदीचे आणि ९ ते ९.३० मेट्रिक टन वाळलेल्या हळदीचे उत्पादन मिळते. उतारा २३ टक्के असून कुरकुमीनचे प्रमाण ५.३५ टक्के आहे. पानावरील करपा आणि कंदमाशी या दोन्ही समस्यांवर हा वाण प्रतिकारक मानला जातो. या वाणाची हळकुंडे सरळ, जाड आणि चमकदार असल्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळते.

आंबे हळद ही तिच्या वैशिष्ट्यपूर्ण कैरीसारख्या सुगंधामुळे ओळखली जाते. ही हळद प्रामुख्याने कोकण, तामिळनाडू, बंगाल आणि आसाममधील जंगल भागात आढळते. पक्व होण्यासाठी ७ ते ७.५ महिने लागतात. गाभा फिकट पिवळा-पांढरट असतो. या वाणाचा उपयोग प्रामुख्याने लोणचे तयार करण्यासाठी केला जातो. पारंपरिक औषधी उपयोगांमध्ये जुने व्रण, जखमा, सूज, डोकेदुखी, खरूज आणि तापासारख्या आजारांमध्ये याचा वापर केला जातो.

वायगाव हळद हा पारंपरिक वाण विदर्भातील विशेषतः वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. या वाणाची पाने गडद हिरवी आणि चमकदार असतात. ७ ते ७.५ महिन्यांत तयार होणाऱ्या या वाणाचा उतारा २० ते २१ टक्के मिळतो. कच्च्या हळदीचे २६० ते २७० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ५२ ते ५५ क्विंटल उत्पादन मिळते. या वाणात कुरकुमीनचे प्रमाण चांगले असले तरी करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

कृष्णा हा वाण कडप्पा जातीपासून विकसित करण्यात आला आहे. या वाणाला १० ते १२ रुंद पाने येतात. हळकुंडे लांब आणि प्रमाणबद्ध असतात. कुरकुमीनचे प्रमाण २.५० टक्के असून वाळलेल्या हळदीचे ७५ ते ८० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. मात्र हा वाण करपा आणि पानावरील ठिपके रोगास बळी पडतो.

कडप्पा हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पारंपरिक वाण आहे. कच्च्या हळदीचे ३८० ते ४०० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ६५ ते ७० क्विंटल उत्पादन मिळते. उतारा १७ ते १८ टक्के असून करपा रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी दिसून येतो.

काळी हळद हा विशेष औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध वाण आहे. या वाणाच्या गाभ्याचा रंग गडद निळा असतो आणि पानांच्या मुख्य शिरेवरही निळसर रंग दिसतो. हा वाण ७.५ ते ८ महिन्यांत तयार होतो. पश्चिम बंगालमध्ये कालीमातेच्या पूजेसाठी या हळदीचा वापर केला जातो. आयुर्वेदात कॅन्सर, खोकला, दमा, ताप, लेप्रसी, ब्रॉन्कायटिस आणि एड्ससारख्या विविध आजारांवरील औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो.

हेही वाचा : Beekeeping Schemes | मधुमक्षिकापालनासाठी 50% अनुदान, मोफत प्रशिक्षण; पात्रांकडून अर्ज मागविले

मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल आणि एल निनोमुळे भाव तेजीत जाण्याची शक्यता | India Maize Market

प्रमुख हळद वाणांचा तुलनात्मक आढावा : Turmeric Varieties

वाणपक्व होण्याचा कालावधीकुरकुमीन (%)ओल्या हळदीचे उत्पादन (क्विंटल/हे.)विशेष वैशिष्ट्य
सेलम९ महिने३.५०–४.७५३५०–४००महाराष्ट्रातील सर्वाधिक लागवड
राजापुरी८ महिने२४०–२५०सांगली हळदीस GI मानांकन
पीडीकेव्ही वायगाव२१०–२३० दिवस६.३०३००उच्च कुरकुमीन, रोगप्रतिकारक
फुले स्वरूपा८.५ महिने५.१९३६०बेण्यात १५–२०% बचत
फुले हरिद्रा२५५ दिवस५.३५४००–४०६करपा व कंदमाशी प्रतिकारक
वायगाव७–७.५ महिनेचांगले२६०–२७०विदर्भातील लोकप्रिय वाण
कृष्णामध्यम२.५०वाळलेल्या हळदीचे चांगले उत्पादन
कडप्पामध्यम३८०–४००करपा रोग कमी
आंबे हळद७–७.५ महिनेलोणच्यासाठी प्रसिद्ध
काळी हळद७.५–८ महिनेऔषधी उपयोगांसाठी महत्त्वाची

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा