“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर सकारात्मक निर्णय झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान काही मंत्र्यांनी २०१७ मध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित शेतकरी सर्व निकष पूर्ण करत असूनही विविध प्रशासकीय आणि आर्थिक कारणांमुळे त्यांना कर्जमाफी मिळू शकली नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यानंतर या मागणीस मान्यता देत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. मात्र, कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली रक्कम आणि मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये काही प्रमाणात तफावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमका निधी किती लागणार आणि किती खात्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार, याबाबत सहकार विभागात काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर निधी निश्चित करण्यासाठी सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकूण ६ लाख ५६ हजार कर्जखात्यांना सुमारे ५ हजार ९७५ कोटी रुपयांची कर्जमाफी देणे बाकी होते. या प्रकरणी वंचित शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा उभारला होता. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर राज्य सरकारने मागील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमधून ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून सुमारे ६६ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र, त्यानंतरही ५ लाख ९० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राहिले होते.

दरम्यान, २०१७ च्या योजनेतील अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत असतानाच २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. यामुळे आधीच्या योजनेत पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्या योजनेचा लाभही मिळू शकला नाही. परिणामी हे शेतकरी दोन्ही योजनांपासून वंचित राहिले. गेल्या नऊ वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत काही ज्येष्ठ मंत्र्यांनी पुन्हा एकदा लावून धरली. त्यानंतर सरकारने सकारात्मक भूमिका घेत संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय मंजूर केला.

महत्त्वाचे आकडे : Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

बाबआकडेवारी
लाभार्थी शेतकरी५ लाख ९० हजार
अंदाजित आर्थिक भार१,४०० कोटी रुपये
प्रलंबित कर्जखाती६ लाख ५६ हजार
प्रलंबित कर्जमाफी रक्कम५,९७५ कोटी रुपये
आधी मंजूर निधी५०० कोटी रुपये
आधी लाभ मिळालेले शेतकरी६६ हजार

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, लवकरच अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा