फळभाज्यांचा कचरा नाही, तर अब्जावधी रुपयांची संधी! ग्रीन बायोरिफायनरी बदलणार शेतकऱ्यांचे भविष्य | Green Biorefinery

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : भारताने हरितक्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता (Green Biorefinery) मिळवली आणि त्यानंतर फळे व भाजीपाला उत्पादनातही मोठी झेप घेतली. आज भारत हा जगातील प्रमुख फळे आणि भाजीपाला उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र उत्पादन वाढत असताना उत्पादनोत्तर नुकसानीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतातून निघालेली प्रत्येक फळभाजी ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. काही फळे झाडाखाली पडतात, काही आकारमान किंवा गुणवत्तेमुळे बाजारात नाकारली जातात, काही वाहतुकीदरम्यान खराब होतात, तर काही बाजारात विक्री न झाल्यामुळे वाया जातात.

विविध अभ्यासांनुसार भारतात फळे आणि भाजीपाल्याचे सुमारे ३० ते ४० टक्के उत्पादन विविध टप्प्यांवर वाया जाते. हे नुकसान केवळ उत्पादनाचे नसून त्यामध्ये वापरलेले पाणी, जमीन, ऊर्जा, श्रम आणि पोषक घटकांचाही मोठा अपव्यय दडलेला असतो. त्यामुळे या नुकसानीकडे कचरा म्हणून न पाहता त्यामधील मूल्य शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून ‘ग्रीन बायोरिफायनरी’ ही संकल्पना विकसित झाली आहे.

ग्रीन बायोरिफायनरीमध्ये शेतातील नाकारलेली फळे, पडलेली फळे, प्रक्रिया उद्योगातून निर्माण होणाऱ्या साली, गर, बिया आणि बाजारातील उरलेला भाजीपाला यांना हिरवी जैवसंपत्ती म्हणून पाहिले जाते. ही हिरवी जैवसंपत्ती अनेक उद्योगांसाठी महत्त्वाचा कच्चा माल ठरू शकते. ब्राऊन बायोरिफायनरीमध्ये पिकांचे अवशेष, काडीकचरा आणि पेंढा यांचा वापर केला जातो, तर ग्रीन बायोरिफायनरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळे आणि भाजीपाल्याचा उपयोग केला जातो. या जैवसंपत्तीमध्ये नैसर्गिक साखर, पेक्टीन, सेंद्रिय आम्ले, जीवनसत्त्वे, रंगद्रव्ये, पॉलीफेनॉल्स आणि इतर अनेक जैवसक्रिय संयुगे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

मात्र या हिरव्या जैवसंपत्तीसमोर काही मोठी आव्हानेही आहेत. फळे आणि भाजीपाल्यामध्ये ७० ते ९५ टक्के पाण्याचे प्रमाण असल्यामुळे ती अत्यंत नाशवंत असतात. नैसर्गिक साखर आणि पोषक घटकांमुळे सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते आणि उत्पादनाची गुणवत्ता कमी होऊ लागते. तसेच अशा उत्पादनाची लांब अंतरावर वाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे शेतपातळीवर किंवा गावपातळीवरच स्वच्छता, वर्गीकरण, पल्पीकरण, रस निष्कर्षण, निर्जलीकरण आणि गुणवत्तास्थिरीकरण यांसारख्या प्राथमिक प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

ग्रीन बायोरिफायनरीमध्ये हिरव्या जैवसंपत्तीतील विविध घटकांपासून अनेक मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. फळांमधील नैसर्गिक साखरेपासून जैवतंत्रज्ञान उद्योगासाठी आवश्यक सेंद्रिय आम्ले, जैवइंधने आणि बायोस्टिम्युलंट्स तयार करता येतात. संत्री, मोसंबी, पेरू, डाळिंब आणि आंब्याच्या सालींमध्ये असलेल्या पेक्टीनचा वापर जॅम, जेली, अन्नप्रक्रिया आणि औषध उद्योगात केला जातो. त्याचप्रमाणे पॉलीफेनॉल्स या अँटिऑक्सिडंट संयुगांचा उपयोग न्यूट्रास्युटिकल्स आणि आरोग्यपूरक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

फळांच्या बियांनाही मोठे औद्योगिक महत्त्व आहे. चिकू आणि चिंचेच्या बियांमधून झायलो-ऑलिगोसेकेराइड्स (XOS) तयार करता येतात. हे प्रीबायोटिक घटक मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असून कार्यक्षम अन्नपदार्थ आणि आरोग्यपूरक उत्पादनांमध्ये त्यांचा वापर वाढत आहे.

टोमॅटोतील लायकोपीन, बीटमधील बेटालेन्स, जांभूळ व काळ्या द्राक्षांमधील अँथोसायनिन्स, हिरव्या पालेभाज्यांमधील क्लोरोफिल आणि लाल मिरचीतील कॅप्सॅन्थिन यांसारखी नैसर्गिक रंगद्रव्ये अन्न उद्योगात कृत्रिम रंगांना पर्याय म्हणून वापरली जात आहेत. तसेच संत्री, मोसंबी आणि लिंबाच्या सालींमधून मिळणारे लिमोनीनसारखे सुगंधी तेल सौंदर्यप्रसाधने, स्वच्छता उत्पादने, औषध उद्योग आणि अन्न उद्योगात वापरले जाते.

याशिवाय फळांच्या साली आणि गरामधील आहारतंतू पशुखाद्य, फंक्शनल फूड्स आणि जैविक उत्पादनांसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आज कचरा म्हणून टाकून दिले जाणारे अनेक घटक भविष्यात उच्च मूल्याच्या उद्योगांचा पाया बनू शकतात.

फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादनोत्तर नुकसान कमी करण्यासाठी ‘मॅग्नेट’ प्रकल्पही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्रकल्पाचा उद्देश विविध फळे आणि भाजीपाला पिकांपासून मूल्यवर्धित उत्पादने विकसित करणे आणि त्यासाठी आवश्यक पुरवठा साखळी अधिक सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर मूल्यवर्धनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणाऱ्या साली, बिया, गर आणि इतर उपउत्पादनांमधूनही अतिरिक्त मूल्य निर्माण करण्यावर ग्रीन बायोरिफायनरीचा भर आहे.

भविष्यात शेतीतील उत्पादकतेची व्याख्या केवळ विक्रीयोग्य उत्पादनापुरती मर्यादित राहणार नाही. नाकारलेले उत्पादन, प्रक्रिया उद्योगातील अवशेष आणि बाजारात उरलेला माल यांच्यातील आर्थिक मूल्य ओळखून त्यापासून नवीन उद्योग उभे करण्याची संधी ग्रीन बायोरिफायनरी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे उत्पादनोत्तर नुकसान कमी करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यासाठी ही संकल्पना भविष्यात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

ग्रीन बायोरिफायनरीमधील प्रमुख घटक आणि त्यांचे उपयोग : Green Biorefinery

घटकप्रमुख उपयोग
नैसर्गिक साखरजैवइंधन, सेंद्रिय आम्ले, बायोस्टिम्युलंट्स
पेक्टीनजॅम, जेली, अन्नप्रक्रिया, औषध उद्योग
पॉलीफेनॉल्सन्यूट्रास्युटिकल्स, अँटिऑक्सिडंट उत्पादने
नैसर्गिक रंगद्रव्येअन्न उद्योग, नैसर्गिक फूड कलर्स
सुगंधी तेलेसौंदर्यप्रसाधने, स्वच्छता उत्पादने, औषध उद्योग
बियाप्रीबायोटिक्स, आरोग्यपूरक उत्पादने
आहारतंतूपशुखाद्य, फंक्शनल फूड्स, जैविक उत्पादने

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा