किसानवाणी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. राज्यात सध्या ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू असून पुढील तीन ते चार दिवसांत हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Monsoon Red Orange Alert ) व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत दुपारनंतर हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी उघडीप असली तरी नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
दरम्यान, काही भागांत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. वाढलेल्या तापमानामुळे हवेतील दमटपणा वाढून उकाड्याची तीव्रता जाणवत आहे. याच उष्णतेमुळे दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन अचानक वादळी पावसाच्या सरी कोसळत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
राज्यातील विविध विभागांमधील सरासरी तापमानातही काही प्रमाणात बदल दिसून येत आहे : Maharashtra Monsoon Red Orange Alert
| विभाग | किमान तापमान (°से.) | कमाल तापमान (°से.) |
|---|---|---|
| उत्तर महाराष्ट्र | 19.8 | 31.0 |
| पश्चिम महाराष्ट्र | 16.7 | 30.1 |
| कोकण | 24.0 | 30.7 |
| मराठवाडा | 19.0 | 30.0 |
| विदर्भ | 17.2 | 36.2 |
विविध भागांसाठी हवामान विभागाचे अलर्ट : Maharashtra Monsoon Red Orange Alert
| अलर्ट | जिल्हे / भाग |
|---|---|
| रेड अलर्ट | पुणे घाटमाथा |
| ऑरेंज अलर्ट | पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा |
| येलो अलर्ट (जोरदार पाऊस) | मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली |
| येलो अलर्ट (विजांसह वादळी पाऊस) | नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया |
हेही वाचा : एल निनोचा प्रभाव वाढणार! मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७% शक्यता; NOAA चा ताजा अंदाज | El Nino NOAA
पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण | Goat Farming Enterotoxemia
हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतात काम करताना किंवा प्रवासादरम्यान विजांचा कडकडाट सुरू झाल्यास झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ थांबू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच काढणीला आलेली किंवा शेतात उभी असलेली पिके सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पुढील काही दिवस राज्यात हवामानातील बदल कायम राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
